
मुंबई - मुंबईतील वायू आणि धुळीचे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आता ठोस पावले उचलणार असून, विशेषत: पावसाळ्यानंतरच्या चार महिन्यांत प्रदूषण नियंत्रणावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला साचणारा चिखल सुकून त्यातून मोठ्या प्रमाणात धूळ उडते आणि यामुळे प्रदूषण वाढते. मात्र रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे साफसफाईला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पावसाळ्यानंतर पुढील चार महिने वाहने दिवसाआड उभी करण्याची अमलबजावणी महापालिका करणार असल्याचे डॉ. ढाकणे यांनी स्पष्ट केले.
वायू प्रदूषण नियंत्रणात ‘चार महिने’ निर्णायक -
पर्यावरण विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. ढाकणे यांनी सांगितले की, मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी पावसाळ्यानंतरचा कालावधी महत्वाचा असतो. योग्य वेळी रस्ते स्वच्छ केल्यास साचलेल्या धुळीपासून निर्माण होणारे प्रदूषण घटू शकते. पुढील दीड महिना वायू निर्देशांक वाढणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
२८ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन अनिवार्य, सरकारी-खासगी प्रकल्पांवर समान नियम
महापालिकेने वायू प्रदूषण रोखण्यासाठी २८ मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होत आहे. डॉ. ढाकणे म्हणाले की, खासगी प्रकल्पांप्रमाणेच महापालिका, एमएमआरडीएसह सर्व सरकारी पायाभूत सुविधा प्रकल्पांनाही हे नियम लागू असतील. नियमांचे उल्लंघन झाल्यास सरकारी कामांवरही कारवाई केली जाईल. सध्या दंड १० हजार रुपये असला तरी पुनरावृत्ती झाल्यास दंड वाढवण्याचा विचार सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील लाल मातीबाबत स्पष्ट भूमिका -
दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदानात टाकण्यात आलेल्या लाल मातीबाबत वाद निर्माण झाला असून ती काढून टाकण्याची मागणी होत आहे. याबाबत बोलताना डॉ. ढाकणे म्हणाले लाल माती काढणे कठीण काम आहे. तज्ज्ञ समितीचा अहवाल अभ्यासला जाणार आहे. स्वतः मैदानाची पाहणी केली जाईल. “माती काढणे हा व्यवहार्य पर्याय नाही; उलट मैदानात योग्य दर्जाचे गवत कसे उगवता येईल, यावर विचार केला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment