
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा आणि डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन (DAMA), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ते ६ डिसेंबर दरम्यान चैत्यभूमी परिसरात विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या आरोग्य शिबिरात १००० हून अधिक नागरिकांची तपासणी करून आवश्यक ती उपचारसेवा देण्यात आली. तपासणीत प्रामुख्याने व्हायरल ताप, अतिसार, श्वसन संबंधित आजार तसेच किरकोळ जखमा अशा तक्रारी आढळल्या. याशिवाय बीपी व ब्लड शुगर तपासणीही करण्यात आली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
शिबिराला शहरातील प्रतिष्ठित रुग्णालयांतील वरिष्ठ डॉक्टरांनी भेट देत विद्यार्थ्यांचे आणि डॉक्टरांचे मनोबल वाढविले. यात डॉ. शैलेश मोहिते (अधिष्ठाता, नायर रुग्णालय), डॉ. संगीता रावत (अधिष्ठाता, केईएम), डॉ. सुधीर मेढेकर (विभागप्रमुख, त्वचारोग विभाग, कूपर), डॉ. यशवंत गभाळे (विभागप्रमुख, बालरोग विभाग, सायन) यांचा समावेश होता.
कूपर, नायर, केईएम, सायन आणि जे.जे. रुग्णालयातील विद्यार्थी, इंटर्न्स व निवासी डॉक्टरांनी शिबिरात उत्साही सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली.
शिबिराचे प्रमुख आयोजक डॉ. अमोल सरवदे, डॉ. श्रीकांत पारधे, पियूष जाधव, ईशा गवई, आयुष चापके, भूषण श्रृंगारे होते. शिबिराचे मार्गदर्शन डॉ. अमर अगमे, माजी अध्यक्ष (DAMA मुंबई) व सध्याचे बीएमसी मार्डचे महासचिव, यांनी केले.
या उपक्रमातून गरजू नागरिकांना महत्त्वपूर्ण आरोग्यसेवा मिळाली असून, महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर केलेला हा उपक्रम उल्लेखनीय ठरला.

No comments:
Post a Comment