BMC Election मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत महिलांचा कौल ठरणार निर्णायक! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

BMC Election मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत महिलांचा कौल ठरणार निर्णायक!

Share This

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. मुंबईत एकूण १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार असून, त्यापैकी तब्बल ४८ लाख २६ हजार ५०९ महिला मतदार आहेत. जवळपास ४८ टक्के महिला मतदारसंख्या असल्याने यंदाच्या निवडणुकीत महिलांचे मतदान महापालिकेची सत्ता कुणाच्या हाती जाणार, हे ठरवणारे ठरणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती याव्यात यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत जनतेचा कौल मिळवण्यासाठी महायुती सरकारकडून विविध लोकाभिमुख योजनांचा पाऊस पाडण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विशेष ठरली. या योजनेअंतर्गत महिलांच्या थेट बँक खात्यात आर्थिक मदत जमा झाल्याने विधानसभा निवडणुकीत नोकरदार महिलांसह अनेक लाडक्या बहिणींनी महायुतीला पसंती दिल्याचे चित्र दिसून आले.

आता मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी नव्याने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा, विधानसभा किंवा नगरसेवकांची निवडणूक असो, मतदारांचा कौलच राजकीय पक्षांचे भवितव्य ठरवत असतो. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या कौलानंतर आता महापालिकेच्या निवडणुकीतही जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी पक्षांनी कंबर कसली आहे.

विशेषतः मुंबईतील मोठ्या महिला मतदारसंख्येमुळे, महिलांच्या प्रश्नांवर आधारित धोरणे, योजना आणि विकासकामे यावरच निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महिलांचे मतदानच सत्तेचा कौल ठरवणारे निर्णायक अस्त्र ठरणार, हे निश्चित आहे.

मुंबईतील मतदारसंख्या:
पुरुष: ५५,१६,७०७
महिला: ४८,२६,५०९
अन्य: १,०९९
एकूण: १,०३,४४,३१५

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages