सैफी हॉस्पिटलची मनमानी चालू देणार नाही, केळेवाडी पुल होणारच - मंत्री मंगलप्रभात लोढा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सैफी हॉस्पिटलची मनमानी चालू देणार नाही, केळेवाडी पुल होणारच - मंत्री मंगलप्रभात लोढा

Share This

मुंबई - गिरगावकरांच्या सुविधेत बाधा ठरणाऱ्या सैफी हॉस्पिटलची मनमानी चालू देणार नाही. चर्नी रोड केळेवाडी पुल पूर्णत्वास गेल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी परखड भूमिका कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडली आहे. गिरगावकरांनी सैफी हॉस्पिटल समोर सोमवारी संध्याकाळी केलेल्या आंदोलनात मंत्री लोढा सहभागी झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सैफी हॉस्पिटल प्रशासनाच्या मनमानीचा पाढाच वाचला. 

गिरगाव मधील चर्नी रोड ते केळेवाडी पर्यंत पुल व्हावा, यासाठी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गेली तीन वर्ष सातत्याने लढा दिला आहे. प्रशासकीय पातळीवर मुंबई महापालिका तसेच पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल प्रशासनाशीही त्यांनी बैठका घेतल्या आहेत. मुंबई महापालिकेकडे या पुलाचा पाठपुरावा करून मंत्री लोढा यांनी पालिकेकडून मान्यता मिळवली. त्यासाठी निधीची तरतूद देखील झाली. मात्र सैफी हॉस्पिटलने या पुलाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गिरगावकरांच्या प्रश्नाची दखल घेऊन मुंबई महपालिकेला पूल बांधण्यास परवानगी दिली. पालिकेने पुलाचे कामही सुरू केले. पुलाचे ६० टक्के काम पूर्ण होत असतानाच, पुन्हा सैफी हॉस्पिटल प्रशासनाने यात अडवणूक केली आहे. या विरोधात गिरगावकरांनी केलेल्या आंदोलनात मंत्री लोढा यांनी सक्रिय सहभाग घेऊन गिरगाव करांच्या पाठीशी ठामपणें उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.    

दरम्यान, स्थानिकांना कोणतीही सूचना न देता आता या पुलाचे काम थांबवण्यात आले आहे. यासंदर्भात मंत्री लोढा यांनी पालिका मुख्यालयात बैठक घेऊन सह आयुक्त चंद्रशेखर चोरे यांना याचा जाब ही विचारला होता. मात्र त्यांनी असमाधानकारक उत्तर देऊन उडवाउडवीची उत्तरे दिली. पालिकेने कोणाच्याही दबावाखाली न येता न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा पुलाचे काम सुरू करावे, असे आदेश मंत्री लोढा यांनी दिले आहेत. तसेच जो पर्यंत पुलाचे काम पूर्ण होत नाही, तो पर्यंत याचा पाठपुरावा करतच राहणार असल्याचा निर्धार मंत्री लोढा यांनी या आंदोलनानंतर दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages