मालवणी आरोग्य प्रशिक्षण केंद्राला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या, मंगल प्रभात लोढा यांची सूचना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मालवणी आरोग्य प्रशिक्षण केंद्राला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या, मंगल प्रभात लोढा यांची सूचना

Share This

मुंबई - मालाडमध्ये उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी करणे शक्य झाले, याचे समाधान आहे. मालाड परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. येत्या काळात या केंद्राच्या माध्यमातून अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. या केंद्राला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे आणि त्यादृष्टीने लवकरात लवकर प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी सूचनाही लोढा यांनी यावेळी केली.

पश्चिम उपनगरात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मालाड मालवणी स्थित नव्याने उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण आज (दिनांक ६ डिसेंबर २०२५) मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शुभहस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या माध्यमातून ही सेवा पश्चिम उपनगरातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

या सोहळ्यासाठी स्थानिक आमदार अस्लम शेख, उपआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, सहायक आयुक्त (पी उत्तर) कुंदन वळवी आदी मान्यवर उपस्थित होते. 

मालाड मालवणी स्थित नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या सुविधेमुळे सुमारे साडेतीन लाख नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध होईल. तसेच आरोग्य केंद्रातून संदर्भित करण्यात येणारे रुग्ण महानगरपालिकेच्या प्रमुख तसेच उपनगरीय रुग्णालयांमध्ये संदर्भित करणे शक्य होईल. परिणामी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांवर येणारा ताण कमी करण्यासाठी मदत होईल.
 
नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्रातील दुसर्‍या टप्प्यातील कामे ही वेगाने पूर्ण करण्यात यावी. तसेच पूर्ण क्षमतेने केंद्र सुरू करण्यात यावे, जेणे करून समाजातील सर्व घटकांना आरोग्य सुविधांचा लाभ घेणे शक्य होईल, अशी सूचना स्थानिक आमदार अस्लम शेख यांनी केली. मालवणी, मढ भागातील नागरिकांना या केंद्राच्या माध्यमातून आपल्याच परिसरात उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

वर्षाकाठी मालवणी परिसरातील सुमारे साडेतीन लाख रुग्णांना या केंद्राच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे. येत्या काळात विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली.

या नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय, महिला आरोग्य, त्वचाविकार, दंत, क्षयरोग यासारख्या आजारांसाठीची बाह्यरुग्ण विभागाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याठिकाणी वैद्यकीय सुविधा घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना नजीकच्या हरिलाल भगवती महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, खुरशादजी बेहरामजी भाभा महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रू. न. कूपर रुग्णालय येथे संदर्भित करण्यात येईल. सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा एकूण ३५ जणांचा चमू या केंद्राच्या ठिकाणी कार्यरत असणार आहे. या कम्युनिटी मेडिसीन विभागामार्फत या चमूमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, २० निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी अशा ३५ जणांचा समावेश आहे. सकाळी ९.३० ते सायंकाळी ४ दरम्यान बाह्यरुग्ण विभागामार्फतची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सकाळ तसेच दुपार सत्रातील बाह्यरुग्ण विभाग सेवेसोबतच विशेष बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

केंद्राच्या इमारतीची वैशिष्ट्ये -
नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विविध आजारांसाठीची बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्रात येणाऱ्या रुग्णांच्या सुविधेसाठी प्रशस्त आसनव्यवस्था आणि प्रतीक्षा कक्षदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. दिवसापोटी २५० ते ३०० रुग्ण हाताळण्याची या बाह्यरुग्ण विभागाची क्षमता आहे. पाच मजली इमारतीतील तीन मजले हे कम्युनिटी मेडिसीन विभागासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येत्या कालावधीत कर्मचारी संख्या वाढवतानाच अद्ययावत अशी हॉस्पिटल मॅनजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (HMIS) प्रणालीही अंमलात येणार आहे. 

वाचनालय, माहिती शिक्षण आणि संवाद सभागृह, सार्वजनिक आरोग्य संग्रहालय, संशोधन केंद्र, लसीकरण कक्ष आदी सुविधाही याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages