
मुंबई - भारतीय टपाल विभागाकडून तरुण पिढीला केंद्रस्थानी ठेवत तंत्रज्ञानाधारित सेवा अनुभव देण्यासाठी मुंबईतील पहिले ‘जेन Z पोस्ट ऑफिस’ आयआयटी मुंबई येथे सुरू करण्यात येणार आहे. या अत्याधुनिक पोस्ट ऑफिसचे उद्घाटन १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयआयटी मुंबईच्या परिसरात होणार आहे.
हा उपक्रम टपाल विभागाच्या आधुनिकीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा असून, युवा पिढीला अधिक प्रभावीपणे जोडण्याचा प्रयत्न आहे. हे जेन Z पोस्ट ऑफिस विशेषतः नोकरीसाठी सज्ज युवक, विद्यार्थी आणि डिजिटल युगातील ग्राहकांसाठी तयार करण्यात आले आहे. या संकल्पनेचा विस्तार दिल्ली, केरळ, गुजरात, बिहार आणि आंध्र प्रदेशमध्येही करण्यात येणार असून, मुंबईतील हा पहिलाच प्रायोगिक उपक्रम ठरणार आहे.
उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह तसेच भारतीय टपाल सेवा (मुंबई विभाग) चे संचालक अरुण चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. टपाल सेवा अधिकारी, कर्मचारी आणि आयआयटी मुंबईतील मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.
हे पोस्ट ऑफिस आधुनिक, पर्यावरणपूरक आणि युवक-केंद्रित रचनेत साकारण्यात आले आहे. त्याची रचना, भित्तीचित्रे आणि डिजिटल डिझाइन आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी संकल्पित व विकसित केली असून, कार्यक्षमतेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.
जेन Z पोस्ट ऑफिसची ठळक वैशिष्ट्ये:
मोफत वाय-फाय सुविधा
कॅफेटेरिया-शैलीतील बैठक व्यवस्था व लहान वाचनालय
समर्पित संगीत कक्ष
निवडक टपाल तिकीट संग्रहासाठी स्वतंत्र कक्ष
पार्सल व लॉजिस्टिक सेवांसाठी ‘पार्सल जेन पोस्ट’
पूर्णपणे डिजिटल, क्यूआर-आधारित सेवा वितरण
आधार नोंदणी व अद्ययावत सुविधा
पोस्ट ऑफिस बचत बँक (POSB) योजनांबाबत मार्गदर्शन
विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती:
स्पीड पोस्ट सेवांवर १० टक्के सवलत
मोठ्या प्रमाणात पार्सल पाठवणाऱ्या ग्राहकांसाठी ५ टक्के सवलत
टपाल कार्यालयाची संकल्पना बदलत, परंपरा आणि नविनतेचा मेळ घालण्याचा हा प्रयत्न असून, भारतीय टपाल सेवेचा उद्देश पुढील पिढीसाठी आकर्षक, सुलभ आणि डिजिटल-मैत्रीपूर्ण सेवा केंद्र उभारण्याचा आहे.
आयआयटी मुंबई येथे सुरू होणारे हे जेन Z पोस्ट ऑफिस हे भारतीय टपाल सेवेच्या नव्या युगाची सुरुवात मानले जात असून, भविष्यात अशा सेवा देशभर विस्तारण्याचा मानस विभागाने व्यक्त केला आहे.

No comments:
Post a Comment