
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होत आहेत परंतु मतदारयाद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत. या मतदार याद्यांमध्ये दुबार मतदारांची संख्या तब्बल ११ लाख असून दुबार नावे असलेल्या मतदारांना शपथपत्र द्यावे लागणार आहे. हा मतदारांना नाहक त्रास असून यामुळे मतदानासाठी मोठ्या रांगा लागतील हे सर्व टाळून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मतदार याद्यातील त्रुटी दूर करून अद्ययावत मतदार याद्या लवकर प्रसिद्ध करा, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
लोकसभेत मतदार याद्यांच्या प्रश्न उपस्थित करुन खासदार वर्षा गाय़कवाड म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका निवडणूक ९ वर्षानंतर होत आहे पण मतदार याद्यांमध्ये मात्र प्रचंड घोटाळे आहेत. ही मतदार यादी 30 ऑक्टोबर 2024 रोजी प्रकाशित केलेली. निवडणूक आयोगाच्याच नियमाप्रमाणे दर वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नवीन यादी प्रसिद्ध होते आणि नंतर दर तीन महिन्याला सुधारित यादी प्रसिद्ध होते पण या वर्षी तसे झाले नाही. निवडणूक आयोगाने प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासही विलंब लावला. 6 नोव्हेंबर 2025 रोजी ही मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती ती पुढे ढकलत 20 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने मतदार यादी प्रसिद्ध केली. आता या प्रारुप मतदार यादीवर हरकरती व आक्षेप नोंदवले जात आहेत परंतु 11 लाख 1505 मतदारांची दुबार नावे कशी आली हा महत्वाचा व गंभीर प्रश्न आहे. दुबार नावे असलेल्यांना मतदानादिवशी शपथपत्र द्यावे लागणार आहे. यामुळे मतदान कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका वार्डातील हजारो नावे दुसऱ्या वार्डात दाखवण्यात आलेली आहेत. हा सर्व घोळ दुरुस्त करून सदोष मतदार याद्या प्रसिद्ध कराव्यात, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

No comments:
Post a Comment