केईएम रुग्णालयात नूतनीकरण केलेल्या ‘जळीत रुग्ण उपचार केंद्रा’चे लोकार्पण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 December 2025

केईएम रुग्णालयात नूतनीकरण केलेल्या ‘जळीत रुग्ण उपचार केंद्रा’चे लोकार्पण


मुंबई - परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात नूतनीकरण करण्यात आलेल्या जळीत रुग्ण उपचार केंद्राचे (Burn Care Center) लोकार्पण आज शैलेश लिमडी यांच्या हस्ते पार पडले. या केंद्रात महिला, बालकांसह आता पुरुष जळीत रुग्णांसाठीही अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून, वर्षाला सुमारे १५० ते १७० रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता या केंद्राची आहे.

या प्रसंगी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, सुघटन शल्यचिकित्सा (प्लास्टिक सर्जरी) विभागप्रमुख डॉ. विनीता पुरी तसेच विविध विभागांचे प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.

भाजलेल्या व जळीत रुग्णांना तत्काळ आणि योग्य उपचार मिळावेत, या दृष्टीने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. रुग्णांना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांनी दिल्या होत्या. विविध शासकीय योजनांद्वारे गरजू रुग्णांना उपचार देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांनी दिली.

नूतनीकरण केलेल्या या केंद्रात एकूण १२ रुग्णशय्या सर्व सुविधांसह उपलब्ध असून, सुसज्ज अतिदक्षता उपचार कक्ष (ICU) उभारण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये व्हेंटिलेटर, मल्टी-पॅरामिटर मॉनिटर, डायलिसिस मशीनसह अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जळीत रुग्णांच्या उपचारांदरम्यान उद्भवणाऱ्या गुंतागुंतींवर अधिक प्रभावी उपचार शक्य होणार आहेत.

रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी व संसर्गाचा धोका टाळण्यासाठी नियंत्रित प्रवेश व्यवस्था करण्यात आली असून, रुग्णांची ने-आण सुलभ होईल अशी रचना करण्यात आली आहे. तसेच, रुग्णांना मानसिक दिलासा मिळावा यासाठी कक्षांमध्ये उत्तम प्रकाशयोजना, आधुनिक फर्निचर आणि मनोरंजनासाठी दूरदर्शन संच बसविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. संगीता रावत यांनी दिली.

जळीत रुग्णांच्या उपचारात वैद्यकीय, भावनिक व सामाजिक स्तरावर आधार देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका या केंद्राची असून, सुरक्षित, मानवीय आणि सन्मानपूर्वक सेवा देण्यासाठी आमचा चमू कटिबद्ध असल्याचे विभागप्रमुख डॉ. विनीता पुरी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS