राज्यात रस्ता अपघातातील मृत्यूंमध्ये लक्षणीय घट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 December 2025

राज्यात रस्ता अपघातातील मृत्यूंमध्ये लक्षणीय घट


मुंबई - महाराष्ट्र राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून, जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत रस्ता अपघातातील मृत्यूंच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे.

परिवहन आयुक्त कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राज्यात एकूण ३२,७८४ अपघातांमध्ये १४,१८५ मृत्यू झाले होते. तर २०२५ मध्ये याच कालावधीत ३३,००२ अपघातांमध्ये १४,०६६ मृत्यू नोंदविण्यात आले. अपघातांची संख्या २१८ ने वाढली असली, तरी अपघाती मृत्यूंमध्ये ११९ ने घट झाली असून मृत्यूदरात ०.८३ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरही दिलासादायक चित्र दिसून येत आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ मध्ये येथे ६६ अपघातांत ८२ मृत्यू झाले होते, तर २०२५ मध्ये ५४ अपघातांत ६१ मृत्यू झाले. यामध्ये अपघातांत १८ टक्के आणि मृत्यूंमध्ये तब्बल २६ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्येही अपघाती मृत्यूंमध्ये घट झाली आहे. नागपूर शहरात २२ टक्के, पालघरमध्ये २० टक्के, अमरावतीत १७ टक्के, पुण्यात १५ टक्के, धुळ्यात १४ टक्के आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये २३ टक्क्यांनी मृत्यू कमी झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

सन २०३० पर्यंत राज्यातील अपघाती मृत्यूंची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी रस्ता सुरक्षा उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच, राज्यातील सर्व वाहनचालक व पादचाऱ्यांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS