२९ महापालिका निवडणुकांचा बिगुल आज? आचारसंहिता लागू होण्याची शक्यता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 December 2025

२९ महापालिका निवडणुकांचा बिगुल आज? आचारसंहिता लागू होण्याची शक्यता


मुंबई - मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या बहुप्रतिक्षित निवडणुकांचा बिगुल आज वाजण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली असून आज सायंकाळी ४ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून त्याचबरोबर आचारसंहिता तात्काळ लागू होण्याची चिन्हे आहेत.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप १४ डिसेंबर रोजी झाल्यानंतर, गेल्या सात ते आठ वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १५ डिसेंबरनंतर केव्हाही जाहीर होतील, अशी चर्चा सुरू होती. त्यानुसार पुढील २४ तासांत निवडणूक प्रक्रियेला वेग येईल, असा अंदाज वर्तवला जात होता. आजची पत्रकार परिषद या चर्चांना दुजोरा देणारी ठरण्याची शक्यता आहे.

२९ महापालिका – एकाच टप्प्यात मतदान? - 
राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याचा आयोगाचा विचार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नागपूरसह प्रमुख महापालिकांचा समावेश आहे. एकाच टप्प्यात निवडणुका झाल्यास संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापणार असून प्रचाराला मोठी रंगत येणार आहे.

जिल्हा परिषद–पंचायत समित्यांचे ‘दोन टप्पे’ चित्र - 
दुसरीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांबाबत आरक्षणाचा मुद्दा अजूनही निर्णायक ठरत आहे. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेण्याची शक्यता आहे. उर्वरित ठिकाणी आरक्षणासंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात निवडणुका जाहीर केल्या जाऊ शकतात.

सूत्रांच्या माहितीनुसार, १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत आयोगाने प्राथमिक चाचपणी केली असून, महापालिका निवडणुकांआधीच किंवा त्यांच्यासोबतच जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचा पर्याय तपासला जात आहे.

निवडणुकीचा ‘डबल बार’ उडणार? - 
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकाच कालावधीत जाहीर झाल्यास राज्यातील राजकारणात ‘डबल बार’ उडणार असल्याचे चित्र आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून, उमेदवारांची चाचपणी, आघाड्या-युतींचे गणित आणि प्रचार यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.

आजच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राजकीय महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, निवडणुकांच्या घोषणेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाला पुन्हा एकदा गती मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS