तेजस्वी घोसाळकरांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, भाजपात प्रवेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 December 2025

तेजस्वी घोसाळकरांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, भाजपात प्रवेश


मुंबई - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी अखेर पक्षाला जय महाराष्ट्र करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या त्या सून असून, त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान घोसाळकर यांनी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. 

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांचा प्रभाग आरक्षित झाला होता. या निर्णयानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्या वेळी त्यांनी “पक्षाचे काम जोमाने सुरू ठेवणार” असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. तरीही, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पक्षांतराबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. अखेर आज सोशल मीडियावरील भावनिक पोस्टद्वारे त्यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिल्याची अधिकृत घोषणा केली.

राजीनाम्याची माहिती देताना तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
“आयुष्यात असा क्षण कधी येईल आणि मला असे शब्द लिहावे लागतील, याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. आज मन खूप जड आहे. शब्द अपुरे पडत आहेत, पण तरीही हा संवाद आवश्यक आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या पोस्टला “नाती बदलू शकतात, पण ऋणानुबंध नाहीत” असे भावनिक कॅप्शन देत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी असेही नमूद केले की,
“मी कधीही असे म्हणणार नाही की माझा पक्ष किंवा माझे नेते मला ताकद देऊ शकत नाहीत. मात्र, मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून, माझ्या लोकांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवण्यासाठी, प्रभाग क्रमांक १ असो वा इतर परिसर, तसेच माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मला एका वेगळ्या निर्णयाकडे पाहावे लागले.”

तेजस्वी घोसाळकर या मुंबई महापालिकेतील सक्रिय आणि ओळखल्या जाणाऱ्या माजी नगरसेविका असून, त्यांनी स्थानिक पातळीवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा परिणाम येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आला असून, आगामी काळात त्या कोणत्या पक्षात प्रवेश करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS