पत्रकार सिद्धेश मराठे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध, हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2025

पत्रकार सिद्धेश मराठे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध, हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी


राजापूर (रत्नागिरी) - राजापूर तालुक्यातील पत्रकार सिद्धेश मराठे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आणि मारहाणीचा समाजाच्या सर्व स्तरांतून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे. या गंभीर घटनेची तातडीने दखल घेण्याची मागणी करत राजापूर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे. हल्लेखोर व गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून कडक शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

राजापुरात यापूर्वी घडलेल्या पत्रकार शशिकांत वारीशे हत्या प्रकरणाने संपूर्ण तालुका हादरून गेला असताना, त्यानंतर आता पत्रकार सिद्धेश मराठे यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे पत्रकारिता दाबण्याचा थेट प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे कोकणातील पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पत्रकार लोकांच्या मनातील ज्वलंत प्रश्न मांडत असतात. मात्र सत्य मांडल्यास आपले काळे धंदे उघड होतील या भीतीपोटीच अशा हल्ल्यांचे कट रचले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. राजापुरातील जनतेने या घटनेचा जाहीर निषेध करत, कोकणात गुंडप्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही सरकारला दिला आहे.

पत्रकारांवरील वाढते हल्ले हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून, अशा घटनांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विविध संघटनांकडून होत आहे. “एखाद्या गावात छोटासा कार्यकर्ता पाडला गेला तरी सरकार तत्काळ हालचाल करते, मग पत्रकारांवर हल्ले होत असताना सरकार गप्प का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे पत्रकारांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे फक्त कागदावरच असल्याची तीव्र टीका होत आहे. कोरोना काळानंतर पत्रकारांची आर्थिक, सामाजिक अवस्था बिकट झाली असताना ना संरक्षण आहे, ना भविष्याची हमी. चौकशीचे आदेश आणि तात्पुरत्या आर्थिक घोषणा यापलीकडे सरकारकडे काहीच उत्तर नसल्याची भावना पत्रकारांमध्ये वाढत आहे.

पत्रकारिता करायची कशी आणि पत्रकारांनी सुरक्षितपणे जगायचे कसे, हा प्रश्न आज अधिक तीव्र झाला असून, सरकारने या विषयावर ठोस भूमिका घ्यावी आणि पत्रकारांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS