
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित मास्टर प्रशिक्षण (प्रशिक्षकांचे प्रशिक्षण) कार्यक्रम आज संपन्न झाला. भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्ष सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
या प्रशिक्षण कार्यक्रमास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, विशेष कार्य अधिकारी (अतिक्रमण निर्मूलन, म्हाडा) संदीप कळंबे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षणात ईव्हीएम यंत्रांची हाताळणी व सुरक्षितता, मतदान साहित्य व्यवस्थापन, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, मतदान प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर करावयाची कामे, मतदानापूर्वी मॉक पोल, मतदार ओळखपत्र तपासणी, ईव्हीएम सीलिंग तसेच मतमोजणीच्या दिवशी नेमून दिलेल्या कर्तव्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आज प्रशिक्षण घेतलेले अधिकारी येत्या २९ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षण सत्रांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.
महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा २९ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडणार असून दुसरा टप्पा ५ जानेवारी ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण १०,२३१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे ६४,३७५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सात प्रशिक्षण केंद्रांवर तीन सत्रांमध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२ ते २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर ५ प्रशिक्षक याप्रमाणे एकूण ३५ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहर विभागातील कर्मचाऱ्यांसाठी ना. म. जोशी मार्ग येथील महानगरपालिका शाळेचा तळमजला, भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृह, शीव रुग्णालयाचे मुख्य सभागृह; पश्चिम उपनगरासाठी बोरिवलीतील प्रबोधन ठाकरे नाट्यगृह, विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, वांद्रे येथील बालगंधर्व सभागृह; तर पूर्व उपनगरातील कर्मचाऱ्यांसाठी मुलुंड (पश्चिम) येथील महाकवी कालिदास नाट्यगृह येथे प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या प्रशिक्षणात मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच मदतनीस यांचा समावेश असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.

No comments:
Post a Comment