‘ई-केवायसी’ न केल्याने ६७ लाख लाडक्या बहिणी अपात्र - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2026

‘ई-केवायसी’ न केल्याने ६७ लाख लाडक्या बहिणी अपात्र


मुंबई - ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladaki Bahin Yojana) योजनेतील अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५पर्यंत ‘ई-केवायसी’ (E  KYC) करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, मुदतीपर्यंत ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण न केल्याने राज्यातील तब्बल ६७ लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

राज्यात या योजनेसाठी एकूण २ कोटी ४७ लाख महिला पात्र ठरल्या होत्या. यापैकी १ कोटी ८० लाख महिलांनी ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली, तर उर्वरित महिलांनी प्रक्रिया न केल्याने त्यांचा लाभ धोक्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून २०२४ मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर तब्बल २ कोटी ६२ लाख महिलांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्य सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडू लागला.

दरम्यान, चारचाकी वाहनधारक, सरकारी सेवेत असताना लाभ घेत असलेल्या महिलांची छाननी केल्यानंतर १० लाख महिला अपात्र ठरल्या. तसेच ५ लाखांहून अधिक महिलांचे आधार कार्ड तांत्रिक कारणांमुळे बँक खात्याशी लिंक न झाल्याने अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सध्या पात्र महिलांची संख्या २ कोटी ४७ लाखांवर स्थिरावली आहे.

राज्याच्या तिजोरीवरील भार कमी करण्याच्या उद्देशाने ‘ई-केवायसी’ बंधनकारक करण्यात आले. दरम्यान, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते अद्याप देणे बाकी असून, नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरअखेरीस पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS