एसटीच्या यूपीआय तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एसटीच्या यूपीआय तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती

Share This

मुंबई - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेमध्ये डिजिटल व्यवहारांना प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, फोन पे, गुगल पे व इतर यूपीआय माध्यमांतून तिकीट काढण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत एसटी महामंडळात दररोज लाखोंच्या संख्येने यूपीआय व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत.

महामंडळाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये सुमारे ४९.७९ लाखांहून अधिक यूपीआयद्वारे तिकीट व्यवहार झाले असून, त्यातून ६४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. ऑक्टोबर २०२५ मध्ये हा महसूल वाढून ७७.३२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. तर नोव्हेंबर महिन्यात यूपीआय व्यवहारांमधून ७८.६६ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची नोंद आहे. डिसेंबर २०२५ मध्येही ही वाढती प्रवृत्ती कायम राहिली असून, सुमारे ६२.५९ लाखांहून अधिक यूपीआय तिकीट व्यवहारांमधून ८३.६७ कोटी रुपयांचा महसूल एसटी महामंडळाला मिळाला आहे.

नको सुट्ट्या पैशाची कटकट, तिकीट काढा झटपट..!
एसटी महामंडळाने बसस्थानके, तिकीट खिडक्या तसेच प्रवासादरम्यान कंडक्टरकडून यूपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून, रोख रक्कम आणि सुट्ट्या पैशांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशांवरून वाहकांशी होणारे अनावश्यक वादही थांबले आहेत.

यासोबतच, काही ठिकाणी होणारा पैशांचा अपहार रोखण्यासाठी डिजिटल पेमेंट प्रक्रिया उपयुक्त ठरत असून, यूपीआय व्यवहारांमुळे महसुलात पारदर्शकता वाढली आहे. परिणामी महसूल गळतीला आळा बसण्यास मदत होत असल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. येत्या काळात एसटी प्रवासात डिजिटल पेमेंटचा वापर आणखी वाढेल, असा विश्वासही प्रशासनाने व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages