
मुंबई - मुंबई महापालिकेच्या प्रभादेवीतील वॉर्ड क्रमांक 194 मध्ये ठाकरे गटाने मोठा राजकीय धक्का देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा पराभव केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार निशिकांत शिंदे यांनी अतिशय चुरशीच्या लढतीत समाधान सरवणकर यांना 592 मतांनी मात दिली.
प्रभादेवी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असताना, शिवसेनेतील फुटीनंतर हा वॉर्ड शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला होता. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी माजी आमदार सदा सरवणकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता महापालिका निवडणुकीत त्यांच्या मुलालाही पराभवाचा सामना करावा लागल्याने सदा सरवणकर यांना दुहेरी झटका बसला आहे.
महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यानंतर हा वॉर्ड ठाकरे गटाच्या वाट्याला गेला. त्यामुळे मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी नाराज झाले होते. त्यांनी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर लोटांगण घातल्याचा आरोप करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. परिणामी, वॉर्ड 194 मध्ये शिंदे गटाचे समाधान सरवणकर विरुद्ध ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे अशी थेट लढत रंगली.
दरम्यान, प्रभादेवीतील राजकीय संघर्षाची पार्श्वभूमीही तितकीच तीव्र आहे. 2017 मध्ये सदा सरवणकर यांनी महेश सावंत यांना डावलून मुलगा समाधान सरवणकर यांच्यासाठी उमेदवारी घेतल्याने बंडखोरी झाली होती. त्या निवडणुकीत महेश सावंत यांना अवघ्या 252 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पुढे शिवसेनेतील फाटाफुटीनंतर सरवणकर शिंदे गटात गेले आणि प्रभादेवीत दोन्ही गटांतील संघर्ष अधिक तीव्र झाला.
आजच्या निकालाने प्रभादेवीतील राजकीय गणित बदलले असून, ठाकरे गटाने शिंदे गटाच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

No comments:
Post a Comment