
मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गज राजकीय नेत्यांच्या नातलगांना पराभवाचा सामना करावा लागला असून, काही वॉर्डांमध्ये मात्र चर्चेतील उमेदवारांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी व्यक्तीपेक्षा कामगिरीला प्राधान्य दिल्याचे चित्र दिसून आले आहे.
गँगस्टर अरुण गवळी यांची कन्या गीता गवळी प्रभाग क्रमांक 212 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या कन्या दीप्ती वायकर पोतनीस यांनाही प्रभाग क्रमांक 73 मध्ये पराभवाचा धक्का बसला. शिवसेनेने (शिंदे गट) उमेदवारी दिली असली तरी ठाकरे गटाच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला.
प्रभाग क्रमांक 184 मध्ये खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे यांना काँग्रेसच्या आशा काळे यांनी पराभूत केले. तसेच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांनाही कुर्ल्याच्या प्रभाग क्रमांक 165 मधून पराभव स्वीकारावा लागला.
दरम्यान, या निवडणुकीत काही ठिकाणी मोठे विजयही नोंदवले गेले. ठाकरे गटाचे मिलिंद वैद्य आणि हेमांगी वरळीकर यांनी विजय मिळवला आहे. भाजपच्या तेजस्वी घोसाळकर तसेच माजी मंत्री असलम शेख यांच्या भगिनीनेही निवडणुकीत यश संपादन केले.
प्रभादेवीतील वॉर्ड क्रमांक 194 मध्ये ठाकरे गटाने मोठा राजकीय धक्का देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा पराभव केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार निशिकांत शिंदे यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत सरवणकर यांना अवघ्या 592 मतांनी मात दिली.
एकूणच, मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालातून अनेक दिग्गजांना अनपेक्षित धक्के बसले असून, काही नव्या आणि चर्चेतील चेहऱ्यांनी आपली ताकद सिद्ध केली आहे.

No comments:
Post a Comment