
मुंबई - राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल जाहीर होत असताना महायुतीने मोठे वर्चस्व मिळवले आहे. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २६ महानगरपालिकांमध्ये भाजपाला मोठे यश मिळाले आहे. मुंबई महापालिकेत (BMC Election) भाजपा (BJP) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महायुतीने १२६ जागांवर आघाडी/विजय मिळवला असून ठाकरे बंधूंच्या उबाठा शिवसेना आणि मनसे आघाडीला ७२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अद्याप मतमोजणी सुरू असून संपूर्ण निकाल रात्री उशिरापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
या निकालानंतर मुंबई महानगरपालिकेत भाजपाचा महापौर होणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे तब्बल २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील वर्चस्वाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९९६ पासून सलग शिवसेनेचाच महापौर विराजमान होता. शिवसेनेचे पहिले महापौर मिलिंद वैद्य होते आणि विशेष म्हणजे २०२६ च्या या निवडणुकीतही ते निवडून आले आहेत. त्याआधी १९९५–९६ मध्ये काँग्रेसचे रा. ता. कदम हे महापौर होते. त्यानंतर २०१७ पर्यंत सलग १२ वेळा शिवसेनेचे महापौर निवडून आले.
दरम्यान, या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६४ जागा मिळवल्या होत्या. २०१७ मध्ये शिवसेनेने एकट्याने ८४ जागा जिंकल्या होत्या. जागांमध्ये घट झाली असली तरी पक्षफुट, चिन्ह गमावणे आणि अनेक नगरसेवक शिंदे गटात गेल्यानंतरही ठाकरे गटाने मुंबईत चांगली कामगिरी केल्याचे चित्र आहे. यावरून उद्धव ठाकरे यांचे संघटनात्मक बळ अजूनही मजबूत असल्याचे स्पष्ट होते.
मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे महापौर (१९९६–२०१७):
मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, नंदू साटम, हरेश्वर पाटील, महादेव देवळे, दत्ताजी दळवी, शुभा राऊळ, श्रद्धा श्रीधर जाधव, सुनील वा. प्रभु, स्नेहल सूर्यकांत आंबेकर, विश्वनाथ महाडेश्वर, किशोरी पेडणेकर.
या निकालामुळे मुंबईच्या राजकारणात मोठा बदल घडत असून पुढील काळात महापालिकेतील सत्ताकेंद्रे आणि धोरणांमध्ये काय बदल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment