
मुंबई – मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (१५ जानेवारी २०२६) पार पडलेल्या मतदानात शहरात एकूण 52.94 टक्के मतदान झाले आहे. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत 54 लाख 76 हजार 43 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
लिंगनिहाय मतदानाचा तपशील पाहता, 29 लाख 23 हजार 433 पुरुष, 25 लाख 52 हजार 359 महिला तर 251 इतर मतदारांनी मतदान केले आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार नोंदणीकृत असून, यामध्ये ५५ लाख १६ हजार ७०७ पुरुष, ४८ लाख २६ हजार ५०९ महिला आणि १ हजार ९९ इतर मतदारांचा समावेश आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात मतदानाची गती मंद होती, मात्र दुपारनंतर मतदानात वाढ झाली.
दरम्यान, काही भागांमध्ये मतदान केंद्र बदलण्यात आल्याने मतदारांची धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मतदार यादीत नावे नसणे, तसेच मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. या प्रकारांमुळे अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २२७ प्रभागांसाठी सुमारे १,७०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारनंतर मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता येणार याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
वेळेनुसार मतदानाची टक्केवारी :
▪ सकाळी ९.३० वाजेपर्यंत – ६.९८%
▪ सकाळी ११.३० वाजेपर्यंत – १७.७३%
▪ दुपारी १.३० वाजेपर्यंत – २९.९६%
▪ दुपारी ३.३० वाजेपर्यंत – ४१.०८%
▪ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत – ५२.९४%
आता सर्वांचे लक्ष मतमोजणीच्या निकालाकडे लागले असून, मुंबईच्या सत्तेचा कौल काही तासांत स्पष्ट होणार आहे.

No comments:
Post a Comment