महापालिका निवडणुकांतील बिनविरोध उमेदवारांबाबत निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2026

महापालिका निवडणुकांतील बिनविरोध उमेदवारांबाबत निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश


मुंबई - राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये (Municipal Elections) सत्ताधारी भाजप (BJP) व शिवसेना (शिंदे गट)(Shivsena) पक्षांचे उमेदवार मोठ्या संख्येने बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, विरोधी पक्षांकडून याबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) या संपूर्ण प्रक्रियेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

दबाव, धमकी, प्रलोभनाचा वापर झाला का? — आयोगाची चौकशी 
बिनविरोध निवडणुकीमागे कोणताही दबाव, धमकी अथवा प्रलोभनाचा वापर झाला आहे का, याची सखोल चौकशी करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. विरोधी पक्षांच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करू न देण्यासाठी किंवा अर्ज मागे घेण्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

निवडणूक यंत्रणेकडून सविस्तर अहवाल मागवले - 
या प्रकरणी आयोगाने संबंधित प्रभागांतील निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिका आयुक्त (निवडणूक प्रभारी) तसेच पोलीस आयुक्त यांच्याकडून स्वतंत्र आणि सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या अहवालांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना किंवा अर्ज मागे घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आला होता का, धमकी देण्यात आली का, प्रलोभन दाखवण्यात आले का, तसेच अर्ज स्वीकारू नयेत यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यात आला का, याची तपासणी केली जाणार आहे.

अहवाल येईपर्यंत निकाल जाहीर न करण्याचे निर्देश - 
राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट आदेश दिले असून, संबंधित अहवाल प्राप्त होईपर्यंत ज्या प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, त्या प्रभागांचे निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार नाहीत. हा निर्णय निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी घेण्यात आल्याचे आयोगाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

२९ महापालिकांसाठी उमेदवारी प्रक्रिया पूर्ण - 
राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. त्यानंतर राज्यभरात किमान १६ हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे वृत्त समोर आले आहे. यामध्ये कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि धुळे महानगरपालिकांमधील भाजप उमेदवारांचा समावेश आहे. याआधीही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडींचे प्रमाण लक्षणीय होते.

विरोधकांमध्ये अस्वस्थता; सत्ताधाऱ्यांवर आरोप - 
सत्ताधारी पक्षांचे उमेदवार सातत्याने बिनविरोध निवडून येणे हा निव्वळ योगायोग नसून, यामागे दबावतंत्र वापरण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. या आरोपांमुळेच राज्य निवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आयोगाकडे सादर होणाऱ्या अहवालांनंतर पुढील निर्णय काय घेतला जातो, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS