
मुंबई - घाटकोपर प्रभाग क्र. १२३चे नवनिर्वाचित नगरसेवक सुनील सयाजी मोरे यांनी “एन” वॉर्ड विभागीय कार्यालयात जाऊन उपायुक्त संतोषकुमार धोंडे (परिमंडळ ०७) व सहाय्यक आयुक्त गजानन बेल्हाळे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत प्रभागातील रखडलेली विकासकामे, मूलभूत नागरी सुविधा, तसेच डोंगराळ व दुर्गम भागातील नागरिकांच्या गंभीर समस्या प्रशासनाच्या निदर्शनास ठामपणे आणून देण्यात आल्या.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रभागातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. केवळ आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष कामांवर आमचा भर असून प्रशासनाने वेळेत निर्णय घ्यावेत, अशी ठोस मागणी नगरसेवक मोरे यांनी केली.
प्रभागातील नाले, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, डोंगराळ भागातील घरे, पावसाळ्यातील धोके व आपत्ती व्यवस्थापन याबाबत प्रशासनाने तातडीने कृती आराखडा सादर करावा, अशी भूमिका शिवसेनेने मांडली. नागरिकांच्या प्रश्नांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी ईशान्य मुंबई विभाग क्र. ०८ चे विभागप्रमुख सुरेश पाटील, नवनिर्वाचित नगरसेविका स्वरूपा सुरेश पाटील (प्रभाग १२७), सकीना आयुब शेख (प्रभाग १२४), माजी नगरसेविका स्नेहल मोरे, शाखाप्रमुख प्रकाश भेकरे व विधानसभा समन्वयक शिवाजी शेवाळे उपस्थित होते.
घाटकोपरच्या विकासासाठी शिवसेना (उबाठा) रस्त्यावरही आणि प्रशासनातही संघर्ष करण्यास सज्ज आहे, असा स्पष्ट संदेश या भेटीतून देण्यात आला.

No comments:
Post a Comment