
मुंबई - घाटकोपरहून असल्फा मार्गे साकीनाका–अंधेरीकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून भीषण वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. मेट्रो सेवा सुरू असली तरी स्थानिक रहिवासी व वाहनचालकांना अद्याप रस्तेमार्गावरच अवलंबून राहावे लागत असल्याने भटवाडी, काजूपाडा, जागृती नगर, सावरकर नगर परिसरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. (Ghatkopar News)(Mumbai News)
हा रस्ता विमानतळाकडे जाण्यासाठी महत्त्वाचा असल्याने अनेक प्रवासी अंधेरी–घाटकोपर लिंक रोडचा वापर करतात. मात्र, सततच्या वाहतूक कोंडीमुळे अनेक वेळा प्रवाशांना आपली विमाने रद्द करावी लागल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेषतः संध्याकाळच्या वेळेस ही कोंडी इतकी प्रचंड असते की पायी अवघ्या १५ ते २० मिनिटांत पोहोचता येणाऱ्या अंतरासाठी वाहनाने तब्बल १ ते १.३० तास लागत असल्याचे चित्र आहे.
आपत्कालीन सेवांनाही फटका -
असल्फा व परिसरात तातडीची वैद्यकीय गरज भासल्यास रुग्णालयात पोहोचण्यासाठीही याच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत जर एखादी अनुचित घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोणाची? असा थेट सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
पोलिसांना घेराव; कारवाईचे आश्वासन -
या संदर्भात वाहतूक पोलिसांकडे अनेकदा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला. मात्र नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतर घाटकोपर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी यांनी प्रत्यक्ष वाहतूक कोंडीच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी संतप्त नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले.
अरुंद रस्ता ठरत आहे अडथळा -
खैरानी रोडहून घाटकोपरकडे तसेच घाटकोपरहून खैरानी रोडकडे जाताना राम जोशी इमारतीजवळील अरुंद रस्ता हा कोंडीचा मुख्य कारण ठरत आहे. या ठिकाणी ये–जा करणाऱ्या मालवाहतूक वाहनांमुळे संपूर्ण मार्ग जाम होतो. परिणामी अंधेरी–घाटकोपर लिंक रोडवरून ही कोंडी थेट लाल बहाद्दूर शास्त्री मार्गापर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे, उलट दिशेने येणारे बेशिस्त वाहनचालक आणि रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे उभ्या असलेल्या गाड्यांमुळे परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
जड वाहतुकीवर बंदी कागदोपत्रीच? -
जड वाहतुकीसाठी रस्ता बंद असतानाही मोठे टेम्पो व मालवाहू वाहने ‘आम्ही जड वाहतुकीत येत नाही’ असा शाब्दिक आधार घेत नियम धाब्यावर बसवत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. काही वाहनचालक पोलिसांवर दबाव टाकत असल्याचेही सांगण्यात आले.
याबाबत पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी यांनी बेशिस्त वाहनचालकांवर आणि अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट केले आहे.
कोंडी कायम राहिल्यास जनतेचा उद्रेक होणार? -
मात्र, वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला नाही तर जनतेचा प्रकोप होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. त्यामुळे पोलिसांच्या आश्वासनानंतर प्रत्यक्षात वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment