
मुंबई - RTI अॅक्टिव्हिस्ट व सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांची अंतिम मतदार यादी तातडीने जाहीर करण्याची ठोस मागणी केली आहे.
निवडणुकीस अवघे ८ दिवस शिल्लक असताना अद्याप अंतिम मतदार यादी जाहीर न होणे हा अत्यंत गंभीर प्रकार असून, यामुळे मतदारांचे घटनात्मक व लोकशाही हक्क डावलले जात असल्याचा आरोप गलगली यांनी केला आहे.
अंतिम मतदार यादी वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे मतदारांना आपली नावे तपासण्याची संधी मिळत नाही. चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्याचा हक्क हिरावला जातो. बनावट, दुहेरी व अपात्र नोंदींची शक्यता वाढते. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होतो. या विलंबामुळे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत की, या हलगर्जीपणाला नेमके कोण जबाबदार आहे? निवडणूक यंत्रणा व प्रशासनाने कायदेशीर कालमर्यादा का पाळल्या नाहीत, असा सवालही अनिल गलगली यांनी उपस्थित केला आहे.
अनिल गलगली यांनी पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत. मुंबईतील सर्व २२७ प्रभागांची अंतिम मतदार यादी तातडीने अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. झालेल्या विलंबाबाबत लेखी व सार्वजनिक स्पष्टीकरण द्यावे. जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस व कालबद्ध उपाययोजना जाहीर कराव्यात.
मतदार यादी ही लोकशाही व्यवस्थेची आधारशिला असून, तिच्यातील विलंब लोकशाही प्रक्रियेला बाधा आणणारा असल्याचे नमूद करत, निवडणूक यंत्रणेने तातडीने व पारदर्शक कारवाई करावी, अशी ठाम मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment