कस्तुरबा रुग्णालयातील स्वयंपाक गृहाचे खाजगीकरण, थाळी सिस्टीमला कामगार संघटनेचा तीव्र विरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 January 2026

कस्तुरबा रुग्णालयातील स्वयंपाक गृहाचे खाजगीकरण, थाळी सिस्टीमला कामगार संघटनेचा तीव्र विरोध


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील रुग्णांना जेवण पुरवठा करणाऱ्या स्वयंपाक गृहाचे खाजगीकरण अथवा ‘थाळी सिस्टीम’ लागू करण्याच्या हालचालींना म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. याबाबत संघटनेने मुख्य वैद्यकीय अधीक्षक व कस्तुरबा रुग्णालय प्रशासनाला निवेदन दिले आहे.

संघटनेने आपल्या पत्रात नमूद केले आहे की, १५ जानेवारी २०२६ रोजी स्वयंपाक गृहात काम करणाऱ्या मुख्य कुक, कुक, कुकमेट यांना अन्य पदावर काम देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेला मिळाली आहे. जर खरोखरच स्वयंपाक गृहाचे खाजगीकरण करण्यात येणार असेल, तर यामुळे कामगार व कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार असून संघटना हा निर्णय स्वीकारणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

स्वयंपाक गृह खासगी कंत्राटदाराकडे दिल्यास रुग्णांना मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतील, तसेच मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात बाहेरून जेवण येण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले आहे. कस्तुरबा रुग्णालय हे संसर्गजन्य आजारांवरील उपचारासाठी महत्त्वाचे केंद्र असून, कोरोना काळात याच स्वयंपाक गृहातील कामगारांनी अहोरात्र सेवा दिली होती, याची आठवण करून देण्यात आली आहे.

दरम्यान, स्वयंपाक गृहातील कामगार, कर्मचारी आणि रुग्णांना पूर्वीप्रमाणेच दर्जेदार व वेळेवर जेवण मिळत राहावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. खाजगीकरण अथवा थाळी सिस्टीमबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संघटनेशी चर्चा करावी व तातडीने बैठक बोलवावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

जर कामगार व कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक निर्णय लादण्याचा प्रयत्न झाला, तर संघटनेच्या वतीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा स्पष्ट इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहा सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी दिला आहे.

27 पैकी 15 पदे रिक्त - 
कस्तुरबा रुग्णालयात मुख्य स्वयंपाकी 1, स्वयंपाकी 21, स्वयंपाकी सहाय्यक 5 अशी एकूण 27 पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ स्वयंपाकी यापदावर 12 कर्मचारी काम करत आहेत. स्वयंपाकी 1, स्वयंपाकी 9, स्वयंपाकी सहाय्यक 5 अशी 15 पदे रिक्त आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS