
मुंबई - मुंबई शहरातील लोकल स्थानकांची इंग्रजी नावे बदलण्याचा निर्णय होत असतानाच आता मुंबईतील प्रसिद्ध केईएम रुग्णालयाचे ‘किंग एडवर्ड’ हे नाव बदलण्याचा विचार करता येईल का, यावर मुंबई महापालिकेने गांभीर्याने विचार करावा, अशी सूचना कॅबिनेट मंत्री तथा मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.
केईएम रुग्णालय व सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री लोढा म्हणाले की, “देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होऊनही आजही इंग्रजांच्या गुलामगिरीच्या खुणा कायम आहेत. केईएम रुग्णालयाचे ‘किंग एडवर्ड’ हे नाव ब्रिटिश राजवटीचे प्रतीक आहे. किंग एडवर्डचा आपल्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे हे नाव बदलता येईल का, याबाबत मुंबई महापालिकेने विचार करावा.” या संदर्भातील अंतिम निर्णय पालिका प्रशासन घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी केईएम रुग्णालयात सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत असल्याचे अधोरेखित केले.
दरम्यान, मंत्री लोढा यांनी रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या. काळानुसार रुग्णांच्या उपचारांमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, विशेष व गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांशी टेलीकम्युनिकेशनद्वारे संपर्क साधता येईल अशी यंत्रणा उभारावी, असे त्यांनी सांगितले.
तसेच रुग्णांना एकाच ठिकाणी सर्व शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळावा यासाठी आरोग्य सुविधा केंद्र उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. उपचार, औषधे व तपासण्यांची सर्व माहिती एकाच वेळी मिळावी यासाठी डिजिटल केंद्रे रुग्णालयात असावीत, जेणेकरून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ आणि मनस्ताप कमी होईल, असेही मंत्री लोढा यांनी सांगितले.
कार्यक्रमात केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी रुग्णसेवेच्या भविष्यातील नियोजनाची माहिती दिली.
या कार्यक्रमाला आमदार कालिदास कोळंबकर, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. शैलेश मोहिते, लोकमान्य टिळक रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन इंगळे तसेच दक्षिण मुंबई भाजपच्या अध्यक्ष शलाका साळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment