
मुंबई - मुंबई महापालिकेच्या निष्काळजी रस्ते कामामुळे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रमाला (बेस्ट) फटका बसल्याची घटना घाटकोपर पंतनगर परिसरात घडली. पंतनगर येथील आंबेडकर सर्कलजवळ रस्ता चुकीच्या पद्धतीने खोदण्यात आल्याने बेस्टची ए–३२९ क्रमांकाची बस खड्ड्यात अडकली.
शिवाजी नगर डेपो येथून आगरकर चौक, अंधेरीकडे जाणारी ए–३२९ बस (क्रमांक MH 01 EW 5665) मंगळवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास या अपघाताला सामोरी गेली. पंतनगर आंबेडकर गार्डन येथील टेक्निकल हायस्कूलजवळ हा प्रकार घडला. सदर बस ओलेक्ट्रा कंपनीची असून तिचा वाहन क्रमांक 8824 / SNG / OL आहे.
घटनेच्या वेळी बसमध्ये १२ प्रवासी तसेच चालक आणि वाहक होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप आहेत.
दरम्यान, बस खड्ड्यात अडकल्यानंतर ती बाहेर काढण्याबाबत बेस्ट कंट्रोल आणि ओलेक्ट्रा कंपनीच्या कंट्रोल रूममध्ये उडवाउडवी झाल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर काही काळ बस खड्ड्यातच अडकून राहिली होती. रस्ता अव्यवस्थित व चुकीच्या पद्धतीने खोदल्यामुळेच हा अपघात झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
या घटनेमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. महापालिकेच्या रस्ते कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, निष्काळजी कामामुळे सार्वजनिक वाहतुकीला व प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment