
मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या (Mumbai Municipal Corporation Election 2026) मतदानादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, मतदान करून आलेल्या काही मतदारांच्या बोटावरील खूण पुसली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यासह अनेक मुंबईकरांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
राज ठाकरे यांनी सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटले की, “सरकारने निवडणुका जिंकायच्याच असा निर्धार केला आहे. विधानसभा निवडणुकीत जे केले तेच आता महापालिकेत होत आहे. याआधी मतदानानंतर शाई लावली जायची, पण आता मार्करने खूण केली जाते. ही खूण सॅनिटायझरने सहज पुसली जाते. अशा फ्रॉड निवडणुकांमधून सत्तेत येणं म्हणजे लोकशाही नाही.”
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनीही या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया देत निवडणूक आयोगावर टीका केली. “चार वर्षांनंतर निवडणुका होत आहेत, पण व्यवस्थेत सुधारणा झालेली दिसत नाही. मतदानानंतर बोटावरील खूण पुसली जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. ही शाई नाही, तर लोकशाही पुसली जात आहे,” असे ते म्हणाले.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप फेटाळून लावत सांगितले की, निवडणुकीसंबंधी सर्व निर्णय निवडणूक आयोग घेतो. “याआधीही काही निवडणुकांमध्ये मार्करचा वापर करण्यात आला आहे. शंका असल्यास आयोगाने पर्यायी पेनचा विचार करावा. मात्र निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण करणे योग्य नाही. माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा,” असे आव्हान त्यांनी दिले.
नेमका प्रकार काय?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यंदा मतदान करणाऱ्या नागरिकांच्या बोटावर पारंपरिक निळ्या शाईऐवजी मार्करने खूण केली जात आहे. काही मतदारांनी मतदानानंतर हात धुतल्यावर किंवा सॅनिटायझर वापरल्यानंतर ही खूण निघून जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. पूर्वी मतदानाची शाई अनेक दिवस बोटावर राहत असल्याने दुहेरी मतदानास प्रतिबंध होत असे. मात्र सध्याच्या प्रकारामुळे निवडणूक आयोग आणि मुंबई महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

No comments:
Post a Comment