BMC Election : मतदान केंद्र बदलले, मतदार यादीतील विसंगतीमुळे मुंबईकर त्रस्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

BMC Election : मतदान केंद्र बदलले, मतदार यादीतील विसंगतीमुळे मुंबईकर त्रस्त

Share This

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election) सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि. १५ जानेवारी) सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र, अनेक मतदान केंद्रांवर मतदार यादीतील विसंगती आणि मतदान केंद्रांतील बदल यामुळे सकाळच्या सत्रातच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. वर्षानुवर्षे ज्या मतदान केंद्रावर मतदान करत होते, ती केंद्रे अचानक बदलल्याने मतदारांना केंद्र शोधण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली.

वेगवेगळ्या बूथवर जावं लागलं - 
अनेक मतदारांनी तक्रार केली की, मतदान केंद्रांवर उपलब्ध असलेली छापील मतदार यादी आणि बीएमसीच्या ऑनलाइन डेटाबेसवरील मतदान केंद्राची माहिती यामध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे काही मतदारांना स्वतःचं नाव शोधण्यासाठी दोन ते तीन वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर जावं लागलं.

मतदान केंद्र शोधताना त्रास - 
महानगरपालिकेकडून सुमारे १५ लाखांहून अधिक मतदारांना मतदानाची माहिती चिठ्ठी न पोहोचल्याने आपले मतदान केंद्र नेमके कुठे आहे, याबाबत अनेक मतदार संभ्रमात होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणेच आधीच्या महापालिका निवडणुकीत ज्या केंद्रांवर मतदान केले होते, ती केंद्रे यावेळी बदलण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे नवीन केंद्र शोधताना मतदारांची चांगलीच दमछाक झाली. काही मतदारांनी केंद्र सापडत नसल्याने मतदान न करताच परत जाणे पसंत केले.

ठरलेल्या केंद्रावर नावच नाही - 
दहिसर (पूर्व) येथील रहिवासी जितेंद्र जैन यांनी सांगितले, “माझं नाव ठरवून दिलेल्या मतदान केंद्राच्या यादीत नव्हतं. मी आणि माझा मुलगा चेतन यांना दोन वेगवेगळ्या केंद्रांवर जावं लागलं, तेव्हा कुठे आमची नावं सापडली.”

मतदान न करताच परत - 
सकाळच्या वेळेत अनेक मतदान केंद्रांवर लांबलचक रांगा लागल्या होत्या. त्यात मतदान करून कामावर जाणाऱ्या मतदारांची संख्या मोठी होती. मात्र, नाव सापडत नसल्याने आणि वेळेअभावी अनेक मतदार मतदान न करताच निघून गेले.

मतदार यादीतील विसंगती आणि मतदान केंद्रांतील बदलामुळे सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्साह कमी झाल्याचे चित्र अनेक भागांत दिसून आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages