
मुंबई – मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस मार्गावर जॉन्सन अँड जॉन्सन परिसरात सुरू असलेल्या मेट्रो बांधकामादरम्यान सिमेंटच्या खांबाचा काही भाग चालत्या ऑटोरिक्षा आणि एका कारवर कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी “सुरक्षिततेच्या मानकांमध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत का, याची सखोल चौकशी केली जाईल,” असे स्पष्ट विधान मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले.
या अपघातात एका पुरुषाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर महापौर तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि आमदार मिहीर कोटेचा यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी उपासनी हॉस्पिटल येथे जाऊन जखमींची विचारपूस केली तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
महापौरांनी सांगितले की, मेट्रोच्या सिमेंट खांबाचा एक भाग अचानक बाजूला होऊन रिक्षावर कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या प्रकरणात एमएमआरडीएकडून सुरक्षा उपाययोजनांमध्ये काही हलगर्जीपणा झाला आहे का, याचा तपास करण्यात येणार आहे. “ही घटना अत्यंत दुर्दैवी असून भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी यावेळी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, निल सोमय्या व दिपिका घाग तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment