मुलुंड मेट्रो अपघातातील मृताच्या मुलींचे पालकत्व सरकारने घ्यावे; कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करूनच दाखवा - किशोरी पेडणेकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 February 2026

मुलुंड मेट्रो अपघातातील मृताच्या मुलींचे पालकत्व सरकारने घ्यावे; कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करूनच दाखवा - किशोरी पेडणेकर


मुंबई - मुलुंड येथील मेट्रो पिलर दुर्घटनेनंतर माजी महापौर तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सरकारवर जोरदार टीका करत मृताच्या तीन मुलींचे पालकत्व राज्य सरकारने घ्यावे आणि संबंधित कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करूनच दाखवा, अशी ठाम मागणी केली.

अपघातस्थळी भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले रामधन यादव हे उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील सरपंच होते. त्यांच्या पश्चात तीन मुली आहेत.  त्यांच्या शिक्षणाची, संगोपनाची आणि भविष्यातील जबाबदारी सरकारने घ्यावी. त्यांना राज्य सरकारने सरकारी नोकरी देण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.

या अपघाताप्रकरणी “फक्त कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करून उपयोग नाही. संबंधित कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दाखवा. जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई झाली तरच अशा घटना थांबतील,” असे त्या म्हणाल्या.

मेट्रोच्या कामांमध्ये वारंवार होत असलेल्या दुर्घटनांकडे लक्ष वेधत त्यांनी एमएमआरडीए आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अपघात होऊ नयेत यासाठी एमएमआरडीए, त्यांचे मंत्री आणि मुख्यमंत्री नेमकं काय करत आहेत? त्यांना या विषयात गांभीर्य नाही का?” असा थेट आरोप त्यांनी केला. मुलुंडमधील सर्व नगरसेवक आणि आमदार भाजपाचे असताना देखील कामांमध्ये निष्काळजीपणा कसा झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिल्याचा उल्लेख करत पेडणेकर यांनी चौकशी अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली. आदेश देणे वेगळे आणि प्रत्यक्ष कारवाई वेगळी. या आधीच्या चौकशी अहवालांचे काय झाले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही निष्काळजीपणाचे संकेत देत कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही महापौरांनी केली आहे. या मागणीनुसार सरकारने दोषींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दाखवाच असे आव्हान पेडणेकर यांनी दिले.

दरम्यान, या प्रकरणी दोषींवर नेमकी काय कारवाई होते आणि मृताच्या कुटुंबाला न्याय कसा मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमकी काय आहे घटना - 
मुलुंड येथे बांधकामाधीन मेट्रो पिलरचा भाग कोसळून झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी संबंधित कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कडून कंत्राटदारावर आणि सल्लागारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS