
मुंबई - मुंबईत अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांना दिलेली २३७ बोगस जन्मप्रमाणपत्रे आरोग्य विभागाने एका महिन्याच्या आत ताब्यात घ्यावीत, तसेच शहरातील फेरीवाल्यांच्या जन्मप्रमाणपत्रांसह सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश महापौर रितू तावडे यांनी दिले.
महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
काही दिवसांपूर्वी बोगस जन्मप्रमाणपत्र प्रकरणात, विशेषतः बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा निर्धार महापौरांनी व्यक्त केला होता. त्याच अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली.
उपमहापौर संजय घाडी, भाजपचे गटनेते गणेश खणकर, माजी खासदार किरीट सोमय्या, नगरसेवक निल सोमय्या, प्रकाश गंगाधरे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प. उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा तसेच तहसीलदार, परवाना विभाग आणि पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांनी २३७ जन्मप्रमाणपत्रे पोर्टलवर रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र, अवैधरित्या प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या संबंधित डॉक्टर आणि आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. आतापर्यंत ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून उर्वरितांवर सोमवारपासून कारवाई सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विलंबित प्रकरणांत २१ दिवसांनंतर दिलेल्या जन्मप्रमाणपत्रांची फेरचौकशी करण्याची मागणीही महापौरांनी केली. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून इतरांवरही कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले. १ जानेवारी २०१६ नंतर जारी झालेल्या सर्व संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बोगस जन्मप्रमाणपत्रे ताब्यात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
महापौरांनी शहरातील फेरीवाल्यांची नोंद, परवाने, ओळखपत्रे आणि वास्तव्यासंदर्भातील कागदपत्रांची तात्काळ पडताळणी करण्याचे निर्देश दिले. आधारकार्ड व इतर शासकीय ओळखपत्रांची काटेकोर छाननी करून अवैध कागदपत्रे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
मुंबईत फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून काही परदेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्यास राहून व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. त्यामुळे स्थानिक फेरीवाल्यांवर आर्थिक ताण वाढत असून काही भागांत महिलांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त होत आहे, असे महापौरांनी सांगितले.
फुटपाथवरील अतिक्रमण, अनधिकृत व्यवसाय आणि वाढती गर्दी यामुळे कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमणमुक्त आणि सुरक्षित मुंबईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले. विविध प्रभागांमध्ये विशेष मोहीम राबवण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

No comments:
Post a Comment