मुंबईत थुंकल्यास २५० तर कचरा टाकल्यास ५०० रुपये दंड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत थुंकल्यास २५० तर कचरा टाकल्यास ५०० रुपये दंड

Share This

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी), स्वच्छता आणि स्वच्छताविषयक उपविधी–२०२५ अधिकृतपणे जारी करण्यात आले आहेत. या उपविधींनुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास २५० रुपये, कचरा टाकल्यास ५०० रुपये, ओला व सुका कचरा वर्गीकरण न केल्यास २०० रुपये तसेच विनापरवाना बांधकाम व पाडकाम राडारोडा वाहतूक केल्यास प्रतिवाहन २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.

मुंबई शहर व उपनगरांतील घनकचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन, स्वच्छता राखणे आणि केंद्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन नियम–२०१६च्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर हे उपविधी लागू करण्यात आले आहेत. नागरिक, व्यापारी, औद्योगिक, शासकीय, खासगी आस्थापना तसेच सार्वजनिक व खासगी सर्व ठिकाणांसाठी हे नियम बंधनकारक असतील.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली ही कार्यवाही राबवली जात आहे. यासोबतच नियमित व विशेष स्वच्छता मोहिमा हाती घेतल्या जात आहेत.

डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले की, मुंबई अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण, साठवणूक, वाहतूक व प्रक्रिया यासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन आवश्यक आहे. नागरिकांनी आणि सर्व आस्थापनांनी उपविधींचे पालन करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या उपविधींतर्गत एकूण २१ प्रकारच्या नियमभंगासाठी दंडात्मक कारवाई निश्चित करण्यात आली असून रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, उघड्यावर शौच-लघवी, कचरा जाळणे, बांधकाम राडारोडा अनधिकृत टाकणे, फेरीवाल्यांकडून कचरा व्यवस्थापनात हलगर्जीपणा अशा प्रकारांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages