म्हाडाच्या १२० सदनिका ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 February 2026

म्हाडाच्या १२० सदनिका ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध


मुंबई - मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) अखत्यारीतील विविध वसाहतींमधील एकूण १२० सदनिका ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती म्हाडाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.

यापूर्वी सोडतीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या, मात्र विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या सदनिकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. इच्छुक नागरिकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://bookmyhome.mhada.gov.in येथे नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा तसेच योजना व सदनिका निश्चिती करण्याची प्रक्रिया १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे. सदनिका निश्चित केल्यानंतर अर्जदाराने ४८ तासांच्या आत सदनिकेच्या विक्री किमतीच्या १० टक्के रकमेचा भरणा करणे बंधनकारक असेल. विहित कालावधीत भरणा न झाल्यास सदनिकेवरील दावा आपोआप रद्द होऊन अनामत रक्कम मंडळाकडे जमा होणार आहे.

या योजनेअंतर्गत म्हाडा मुंबई मंडळाने बांधलेल्या शिंपोली (कांदिवली), चारकोप सेक्टर-८, अँटॉप हिल-वडाळा, तुंगा-पवई, पीएमजीपी मानखुर्द, मालवणी-मालाड आणि गायकवाड नगर येथील एकूण ८४ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच विकास नियंत्रण नियमावली ३३(५) व ३३(७) अंतर्गत मंडळाला प्राप्त झालेल्या घाटकोपर पूर्व, विक्रोळी, भायखळा, ताडदेव, लोअर परळ, सायन आणि जेव्हीपीडी अंधेरी पश्चिम येथील ३६ सदनिकांचाही समावेश आहे.

अर्ज सादर करताना अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे व भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. वैवाहिक स्थितीनुसार आधार कार्ड, पॅन कार्ड, न्यायालयीन आदेश, जात प्रमाणपत्र/पडताळणी प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अनिवार्य असतील. आधारशी संलग्न भ्रमणध्वनी क्रमांक आणि वैध ई-मेल आयडी देणेही आवश्यक आहे.

अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर ‘बुक माय होम’ पर्याय उपलब्ध होणार असून त्यामध्ये सदनिकेचा इमारत क्रमांक, सदनिका क्रमांक आणि मजल्याची माहिती दिसणार आहे. अर्जदार एका अनामत रकमेवर एका वेळी केवळ एकाच सदनिकेची निश्चिती करू शकणार आहेत.

सदनिकेच्या विक्री किमतीपैकी १० टक्के रक्कम भरल्यानंतर उर्वरित रक्कम भरण्यासाठी तात्पुरते देकारपत्र दिले जाणार असून उर्वरित रक्कम ९० दिवसांत भरणे आवश्यक आहे. गृहकर्ज घेणाऱ्या अर्जदारांनी संबंधित वित्तीय संस्थेचे Pre-Sanctioned Letter अपलोड करणे बंधनकारक आहे. संपूर्ण रक्कम व मुद्रांक शुल्क भरल्यानंतर सदनिकेचे वाटप व ताबा पत्र दिले जाईल.

दरम्यान, या योजनेसाठी म्हाडाने कोणताही प्रतिनिधी, दलाल किंवा प्रॉपर्टी एजंट नियुक्त केलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अनधिकृत व्यक्तींशी आर्थिक व्यवहार केल्यास त्याची जबाबदारी म्हाडावर राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. फसवणुकीच्या तक्रारीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दलालांपासून सावधान - 
अर्जदारास कोणी दलाल / व्यक्ती परस्पर अर्ज विक्री किंवा म्हाडाच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करणे इ. बाबी करताना आढळल्यास म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी/प्राधिकरण यांच्याशी ०२२-६६४०५४४८ दूरध्वनी क्रमांकावर तसेच मिळकत व्यवस्थापक/पणन/ मुंबई मंडळ यांच्याशी ०२२-६६४०५१२३ दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. अर्जदारांनी अधिक माहितीसाठी ९८६९९८८००० हेल्पलाइन क्रमांकावर किंवा उपमुख्य अधिकारी (पणन), मुंबई मंडळ यांच्याशी ई-मेल: dycoem1@gmail.com वर संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापुर्वी अर्जदारांनी माहिती पुस्तिका व जाहिरात काळजीपुर्वक वाचावी, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS