
मुंबई - मुलुंड पश्चिम एलबीएस रोडवर मेट्रोचे काम सुरू असताना पॅरापेट भिंतीचा काही भाग कोसळून रस्त्यावरील रिक्षा आणि स्कोडा कारवर कोसळला. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. या अपघाताच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.
मुलुंड पश्चिमेत एलबीएस रोडवरील Johnson & Johnson कंपनीसमोर मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान आज दुपारी सुमारे १२.१५ ते १२.२० वाजण्याच्या सुमारास गंभीर अपघात घडला. राजीव (मिलन) परिसरातील मेट्रो लाईनच्या पिलर क्रमांक P196 जवळ उड्डाणपुलावरील पॅरापेट भिंतीचा सुमारे ६ फूट x ४ फूट आकाराचा भाग उंचावरून खाली कोसळून धावत्या वाहनांवर पडला.
कोसळलेला भाग ऑटो रिक्षा (MH-04-MP-1434) आणि खासगी स्कोडा कार (WB-04-AS-1652) यांच्यावर आदळला. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
उपासनी हॉस्पिटलकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
1. रामधन यादव (पुरुष) – रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित
2. राजकुमार इंद्रजीत यादव (वय ४५) – आयसीयूमध्ये उपचार सुरू, प्रकृती चिंताजनक
3. महेंद्र प्रताप यादव (वय ५२) – उपचार सुरू, प्रकृती स्थिर
4. दीपा रुहिया (वय ४०) – उपचार सुरू, प्रकृती स्थिर
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका, तसेच MMRDA आणि महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसर तात्काळ सुरक्षित करण्यात आला असून काही काळ वाहतूक वळवण्यात आली.
MMRDA कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, प्रकल्प पथक घटनास्थळी उपस्थित असून बीएमसी व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या समन्वयाने मदतकार्य आणि संरचनात्मक तपासणी सुरू आहे. घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून बांधकामस्थळी सुरक्षाविषयक उपाययोजनांची पडताळणी केली जात आहे.
या दुर्घटनेमुळे मेट्रो बांधकामातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत -
मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर काही जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment