
मुंबई - मुलुंड पश्चिमेतील एलबीएस रोडवर Johnson & Johnson कंपनीजवळ मेट्रोच्या बांधकामादरम्यान पॅरापेटचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेवर (Mumbai Metro Accident) काँग्रेसच्या खासदार व मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बांधकामाधीन Mumbai Metro Line 4 प्रकल्पाच्या पियर क्रमांक १९६ जवळ घडलेल्या या दुर्घटनेत एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियावर ट्विट करत सरकार आणि MMRDA प्रशासनावर थेट सवाल उपस्थित केले.
“मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का?” असा संतप्त प्रश्न उपस्थित करत त्यांनी म्हटले आहे की, केवळ ‘इन्फ्रा मॅन’ अशी प्रतिमा उभारण्यासाठी पीआर आणि मार्केटिंग करण्यात येते; मात्र प्रत्यक्षात मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला आहे.
मेट्रोचे काम सुरू असताना सुरक्षेचे नियम फक्त कागदावरच का राहतात? वर्दळीच्या रस्त्यावर काम सुरू असताना खालून जाणाऱ्या वाहतुकीसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? कामांचा वेग दाखवण्याच्या नादात दर्जा आणि तांत्रिक सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे का? जबाबदारी कोण घेणार? दरवेळी दुर्घटनेनंतर फक्त ‘चौकशी’ जाहीर केली जाते, पण ठोस कारवाई कधी होणार? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
“विकास हवा आहे; पण तो मुंबईकरांच्या जीवावर बेतणारा नको,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, MMRDAने या घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली असून मृताच्या कुटुंबाला नुकसानभरपाई व जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. मात्र, विरोधकांनी प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

No comments:
Post a Comment