उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 March 2026

उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा


मुंबई - रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता लोकभवन येथील ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये पार पडणार असून या सोहळ्यास भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यातील कौशल्याधारित शिक्षणाच्या दृष्टीने हा सोहळा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या कार्यक्रमास राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री लोढा यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात कौशल्य विकासाला मोठे प्राधान्य देण्यात येत असून त्यातून तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ हे उद्योगाभिमुख शिक्षण देणारे अग्रगण्य संस्थान असून विद्यार्थ्यांना आधुनिक व रोजगारक्षम कौशल्ये देण्यावर भर दिला जात आहे.

जुलै २०२२ मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठाने अल्पावधीतच राज्यभरात विविध केंद्रे सुरू केली असून नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर येथे प्रशिक्षण सुविधा उपलब्ध आहेत. विज्ञान-तंत्रज्ञान, व्यवस्थापन, डिझाईन, तसेच अल्पकालीन कौशल्य अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना उद्योगस्नेही शिक्षण दिले जात आहे. पर्सिस्टन्ट, किर्लोस्कर ग्रुप आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्यांशी भागीदारी करून प्रशिक्षण अधिक प्रभावी करण्यात आले आहे.

दीक्षांत सोहळ्यानिमित्त ‘जयंत सहस्रबुद्धे कौशल्य प्रदर्शन’ आयोजित करण्यात येणार असून विविध औद्योगिक संस्था आणि स्टार्टअप्सचे सुमारे १२ स्टॉल्स येथे उभारले जाणार आहेत. यामध्ये टोयोटा किर्लोस्कर, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, स्वदेश फाउंडेशन यांसारख्या संस्थांचा सहभाग असणार आहे.

या सोहळ्यात विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यासोबतच आदिवासी व ग्रामीण भागातील उत्कृष्ट औद्योगिक संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. कौशल्याधारित शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना देश-विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे मंत्री लोढा यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS