विरोधकांना विकास नाही, फक्त साडी-घड्याळ-दिवाच दिसतो - महापौर रितू तावडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 March 2026

विरोधकांना विकास नाही, फक्त साडी-घड्याळ-दिवाच दिसतो - महापौर रितू तावडे


मुंबई - मुंबईच्या महापौर (Mumbai Mayour) रितू तावडे (Ritu Tawde) यांच्या गाडीवर लावण्यात आलेल्या लुकलुकणाऱ्या लाल दिव्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादावर महापौरांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या प्रकरणात गाडी आणि कार्यालय प्रशासनाने उपलब्ध करून दिले असून वाहनावर बसवलेले दिवे आपल्या मागणीनुसार नव्हते, तर प्रशासनानेच ते बसवले होते, असे तावडे यांनी स्पष्ट केले.

या संदर्भात आपण स्वतःहून आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असून प्रशासनानेही ही चूक मान्य केली आहे. संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला गाडीवरील दिव्याची कोणतीही हौस नसून आम्ही सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर निशाणा साधताना तावडे म्हणाल्या की, भाजप सत्तेत आल्यानंतर बांग्लादेशी, रोहिंग्या तसेच अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. तसेच कंत्राटदारांची साखळी तोडण्यासाठी जेम पोर्टलवरून निविदा मागवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधकांचा थयथयाट सुरू झाला आहे.

“विरोधकांनी मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यांवर बोलले असते तर बरे वाटले असते. मात्र त्यांना साडी, घड्याळ, वेणी, फणी आणि लाल दिवेच दिसत आहेत. हे त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक महापालिकेत येत असल्याचे सांगत, “गेल्या २५ वर्षांत सामान्य नागरिकांना महापालिकेत प्रवेश नव्हता, फक्त कंत्राटदारांचेच वर्चस्व होते. आता मात्र नागरिकांना आपली कामे होतील असा विश्वास निर्माण झाला आहे,” असे त्यांनी सांगितले. दररोज शेकडो नागरिक भेटत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त सुरक्षा मागितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महापौर आरोग्य निधीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या सुमारे ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध असून मदत देताना अर्जदार रुग्ण प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल आहे का याची खात्री करूनच मदत दिली जाईल. महापौर निधी वाढवण्यासाठी हार-फुले आणि पुष्पगुच्छांवरील खर्चही निधीत जमा करण्यासाठी क्यूआर कोडची सुविधा देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी महापालिका सभागृहनेते गणेश खणकर (Ganesh Khankar) यांनीही विरोधकांवर टीका करत, “आम्ही कामाची धडाका लावल्यामुळे विरोधकांच्या उरात धडकी भरली आहे. बांग्लादेशी आणि रोहिंग्यांविरोधातील कारवाई तसेच फेरीवाल्यांवरची मोहीम पुढेही सुरूच राहील,” असे स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS