राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 March 2026

राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर

 

मुंबई - Election Commission of India यांनी देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहिल्यानगर) आणि बारामती (जि. पुणे) या दोन मतदारसंघांचा समावेश आहे.

राहुरी मतदारसंघाचे आमदार Shivaji Bhanudas Kardile आणि बारामती मतदारसंघाचे आमदार Ajit Anantrao Pawar यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मतदानासाठी सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) यांचा वापर करण्यात येणार आहे. मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) हा मुख्य पुरावा असेल. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड आदी कागदपत्रेही ग्राह्य धरली जाणार आहेत.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राहुरी आणि बारामती मतदारसंघात आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती उमेदवार आणि राजकीय पक्षांनी प्रचार काळात तीन वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

जाहीर कार्यक्रमानुसार ३० मार्च २०२६ रोजी निवडणुकीसाठी राजपत्र अधिसूचना जारी केली जाईल. ६ एप्रिल २०२६ ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून ७ एप्रिल २०२६ रोजी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ एप्रिल २०२६ आहे.

यानंतर २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून ४ मे २०२६ रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ६ मे २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणांना आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS