गोरेगाव अमलीपदार्थ प्रकरणानंतर उपनगर सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा ऍक्शन मोडमध्ये - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 April 2026

गोरेगाव अमलीपदार्थ प्रकरणानंतर उपनगर सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा ऍक्शन मोडमध्ये


मुंबई - मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान अमली पदार्थांच्या (ड्रग्स) अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अंमलीपदार्थ विरोधात राज्यभरात धडक कारवाई सुरू आहे. उपनगर जिल्ह्याचा सहपालकमंत्री या जबाबदारीने ह्या लढ्याचा एक भाग म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वांद्रे इथल्या उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलवली असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. 

या बैठकीला उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार,  जिल्हाधिकारी सौरभजी कटियार यांच्यासह अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, उत्पादन शुल्क, महापालिका आणि संबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. 

गोरेगाव येथील घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, प्रशासनाने त्वरीत आणि प्रभावी पावले उचलावीत अशी मागणी सध्या जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारी २० एप्रिल २०२६ रोजी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी दुपारी ४ वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईत अमलीपदार्थांचा विळखा वाढू नये यासाठी प्रशासनाने 'झिरो टोलेरन्स' भूमिका घ्यावी. विशेषतः सार्वजनिक कार्यक्रम, प्रदर्शन आणि मोठ्या गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यात यावी, तसेच अमलीपदार्थ विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या उद्देशाने ही बैठक असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले आहे. 
तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यात घेऊन देशाला कमजोर करणाऱ्यांच्या विरोधात कायदे अधिक कठोर करण्याची वेळ आली असून याबाबत एक लोकचळवळ उभी राहण्याची गरज असल्याचेही लोढा म्हणाले. 

मंत्री लोढा यांनी पुढे सांगितले की, अशा प्रकारच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुप्त माहिती यंत्रणा अधिक सक्रिय करणे, तसेच युवकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणे अत्यंत गरजेचे आहे. संबंधित प्रकरणात मुंबई पोलीस तपास करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी अतिशय बारकाईने या प्रकरणात लक्ष घालत आहेत. आयोजक आणि काही अमलीपदार्थ विक्रेत्यांना अटक करण्यात आली असून त्यांना कडक शासन होईलच,पण या प्रकरणाच्या खोलात जाऊन पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे ही त्यांनी सांगितले.

मुंबईतल्या काही विशिष्ठ भागात बांगलादेशी आणि रोहिंग्याची मोठ्या प्रमाणात घुसखोरी वाढली आहे, त्यातूनही समाजविघातक शक्ती असल्या घटनांना जबाबदार असल्याचे नाकारता येत नाही. यादृष्टीनेही तपास पुढे गेला पाहिजे, असे ठाम मत मंत्री लोढा यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS