
मुंबई - BMC MARD च्या इतिहासात प्रथमच “BMC MARD संविधानाचा” पहिला अधिकृत मसुदा प्रकाशित करण्यात आल्याने निवासी डॉक्टर संघटनांच्या इतिहासात महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. सायन MARD २०२६ च्या नेतृत्व हस्तांतरण समारंभाच्या निमित्ताने हा ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला.
एल.टी.एम.एम.सी. आणि सायन रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर पवार तसेच फॉरेन्सिक मेडिसिन विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत संविधानाच्या मसुद्याचे अधिकृत प्रकाशन करण्यात आले. संघटनेची रचना अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने पुढे नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
BMC MARD च्या संघटनात्मक बळकटीसाठी अनेक महिन्यांच्या अभ्यास, चर्चा आणि सामूहिक प्रयत्नांनंतर संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. संविधानाचे मुख्य लेखक आणि BMC MARD चे उपाध्यक्ष डॉ. दिग्विजय जाधव यांनी संविधानामागील दृष्टीकोन, उद्दिष्टे आणि विविध तरतुदींचे सविस्तर विवेचन केले.
यावेळी सहलेखक तथा BMC MARD चे अध्यक्ष डॉ. चिन्मय केळकर, जनरल सेक्रेटरी डॉ. अमर अगमे आणि उपाध्यक्ष डॉ. रवी सपकाळ यांनीही आपले विचार मांडले. संघटनेला संस्थात्मक स्थैर्य, सातत्यपूर्ण नेतृत्व आणि निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता मिळवून देण्यासाठी संविधान महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान आगामी BMC MARD कार्यकारिणीची स्थापना, निवड प्रक्रिया आणि संविधानिक कार्यपद्धतीबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर पवार यांनी BMC MARD च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत संविधान निर्मितीचा हा निर्णय संघटनेच्या इतिहासातील दूरदृष्टीचा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे सांगितले. निवासी डॉक्टरांच्या हितासाठी संघटनेने एकजूट आणि सक्षम नेतृत्वासह पुढेही प्रभावी कार्य करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
BMC MARD साठी हा दिवस ऐतिहासिक ठरला असून अधिक सक्षम, शिस्तबद्ध, पारदर्शक आणि प्रगत संघटनात्मक भविष्यासाठी या संविधानाची पायाभरणी झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


No comments:
Post a Comment