
मुंबई - एल.टी.एम.एम.सी. व जी.एच. (सायन रुग्णालय) येथील निवासी डॉक्टरांच्या संघटनेचा अर्थात सायन MARD चा शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी नेतृत्व हस्तांतरण समारंभ उत्साहात पार पडला. निवासी डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर, प्राध्यापक तसेच विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या MARD प्रतिनिधींच्या उपस्थितीत नव्या कार्यकारिणीकडे अधिकृतपणे पदभार सोपविण्यात आला.
निवासी डॉक्टरांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या विद्यमान कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचे हस्तांतरण केले. यामध्ये निवृत्त अध्यक्ष डॉ. रवि सपकाळ, निवृत्त जनरल सेक्रेटरी डॉ. वैभव बारी आणि निवृत्त चीफ को-ऑर्डिनेटर डॉ. आयुषी बाफना यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाला एल.टी.एम.एम.सी. व जी.एच.चे डीन, BMC MARD टीम, नायर MARD, KEM MARD, कूपर MARDचे प्रतिनिधी, वरिष्ठ डॉक्टर आणि निवासी डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायन MARD च्या २०२६–२७ या वर्षासाठी नव्याने गठीत झालेल्या कार्यकारिणीमध्ये डॉ. शुभम दुगमवार यांची अध्यक्षपदी, तर डॉ. ऋतुजा राऊत यांची जनरल सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी डॉ. अनिकेत सोनावणे, डॉ. स्नेहल रिंधे आणि डॉ. विवेक केंद्रे यांची निवड झाली असून डॉ. दीपक दाभाडे यांच्याकडे खजिनदारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यावेळी बोलताना निवृत्त अध्यक्ष डॉ. रवि सपकाळ यांनी आपल्या कार्यकाळात सहकार्य करणाऱ्या निवासी डॉक्टर, वरिष्ठ सहकारी, प्राध्यापक आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. नव्या कार्यकारिणीवर विश्वास व्यक्त करत त्यांनी निवासी डॉक्टरांच्या हितासाठी, एकतेसाठी आणि सायन MARD च्या परंपरा व मूल्ये जपत नवीन समिती समर्पितपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.
समारोप प्रसंगी नव्या कार्यकारिणीला पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


No comments:
Post a Comment