“नशामुक्तीचा संदेश घराघरात पोहोचवणे अत्यावश्यक” – मंत्री मंगल प्रभात लोढा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 May 2026

“नशामुक्तीचा संदेश घराघरात पोहोचवणे अत्यावश्यक” – मंत्री मंगल प्रभात लोढा


मुंबई - नेस्को येथे ड्रग्सच्या सेवनामुळे घडलेल्या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री Mangal Prabhat Lodha यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्यभर प्रभावी नशामुक्ती अभियान राबवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची ही पहिली बैठक होती.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मंत्री लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात संपूर्ण वर्षभर “नशामुक्ती अभियान” राबविण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या मान्यतेनंतर गृह विभागाने शासन निर्णय जारी करत उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून, या समितीचे अध्यक्ष म्हणून मंत्री लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बैठकीत २६ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले. शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, व्यायामशाळा, स्पोर्ट्स क्लब तसेच मनपाच्या प्रभाग कार्यालयांमध्ये एकाच वेळी ऑनलाईन कार्यक्रम घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

नशामुक्ती अभियानांतर्गत वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यासाठी मासिक वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. महानगरपालिका, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन तसेच इतर विभागांचा या मोहिमेत सक्रिय सहभाग असणार आहे.

विद्यार्थी आणि युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोस्टर्स, शॉर्ट फिल्म्स, पथनाट्य, जिंगल्स, गाणी तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात नशामुक्ती अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. २६ जून हा केवळ एक दिवस नसून समाजाला योग्य दिशेने नेण्याची जबाबदारी अधोरेखित करणारा महत्त्वाचा क्षण आहे. विशेषतः युवकांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर शासन आणि समाजाने एकत्र येत नशामुक्तीचा संदेश घराघरात पोहोचवणे अत्यावश्यक आहे.”

बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS