कुर्ला बस आगारात नादुरुस्त ई-व्ही दुमजली बसला भीषण आग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 May 2026

कुर्ला बस आगारात नादुरुस्त ई-व्ही दुमजली बसला भीषण आग


मुंबई - कुर्ला बस आगारात शनिवारी (3 मे) सायंकाळी नादुरुस्त ई-व्ही दुमजली बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर काही वेळातच बसने पूर्ण पेट घेतला. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, स्विच मोबिलिटी कंपनीची ई-व्ही दुमजली बस क्रमांक 10440 (MH-01-EE-9649) ही कुर्ला बस आगाराच्या बेसमेंटमध्ये पार्क करण्यात आली होती. दुपारी साधारण 3.55 वाजता बसमधून धूर निघण्यास सुरुवात झाली. ही बाब लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली.

यानंतर आग विझवण्यासाठी उपलब्ध असलेल्या 10 ते 15 अग्निशामक सिलिंडरचा वापर करण्यात आला. मात्र, काही क्षणांतच बसने भीषण पेट घेतला.

घटनेची माहिती मिळताच सायंकाळी 4.10 वाजता अग्निशमन दलाला कळविण्यात आले. त्यानंतर फायर ब्रिगेडच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले.

सदर बस 1 मे रोजी सकाळी 10.15 वाजता तांत्रिक बिघाडामुळे सेवेतून काढून आगारात आणण्यात आली होती. आग लागली तेव्हा स्विच मोबिलिटी कंपनीचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित नव्हते. कंपनीचे अधिकारी नुरुल हसन हे सायंकाळी 4.40 वाजता आगारात पोहोचले.

सुरक्षेच्या कारणास्तव अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगार काही काळासाठी बंद केल्याने दुपारचे बस प्रवर्तन विस्कळीत झाले. अखेर सायंकाळी 6.15 वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS