लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला अपात्र, मंत्री आदिती तटकरे यांनी काय दिलं स्पष्टीकरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 June 2026

लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला अपात्र, मंत्री आदिती तटकरे यांनी काय दिलं स्पष्टीकरण


मुंबई/रत्नागिरी - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल ८० लाख महिला अपात्र ठरल्याची चर्चा राज्यभर रंगली असताना, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती देत अनेक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात असताना, रत्नागिरी येथे माध्यमांशी संवाद साधताना तटकरे यांनी स्पष्ट केले की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला केवळ ई-केवायसी न केल्यामुळे अपात्र ठरलेल्या नाहीत. राज्य सरकारने ई-केवायसीसाठी वारंवार मुदतवाढ देत तब्बल ८ ते १० महिन्यांचा कालावधी उपलब्ध करून दिला होता.

तटकरे यांनी सांगितले की, आयटी विभाग, आरटीओ आणि इतर शासकीय यंत्रणांकडून जवळपास १० ते ११ महिने माहिती संकलित करून लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली. या छाननीत वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या सुमारे ११ ते १२ लाख महिलांचा समावेश अपात्र यादीत करण्यात आला आहे. तसेच ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सुमारे ४.५ ते ५ लाख महिलाही अपात्र ठरल्या आहेत.

याशिवाय, सुमारे १४ हजारांहून अधिक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले असून, त्यांच्याकडून रकमेची वसुली सुरू करण्यात आली आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांची नावे देखील पडताळणीत समोर आली आहेत.

आरटीओकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ३.२५ लाख महिलांच्या नावावर वाहने असल्याचे समोर आले आहे. मात्र, या प्रकरणात अनेकांनी आक्षेप नोंदवल्याने सरकारकडून फेरतपासणी सुरू असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

तसेच, संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना अशा दोन्ही योजनांमध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांचीही स्वतंत्र छाननी करण्यात आली असून, अशा महिलांना केवळ एका योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

दरम्यान, ई-केवायसी पूर्ण करूनही तांत्रिक कारणांमुळे लाभ न मिळालेल्या महिलांसाठी सरकार सकारात्मक असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळाशी चर्चा करून अशा प्रकरणांवर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे थकीत हप्ते वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पात्र महिलांना लाभ मिळत राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS