महानगरपालिका रुग्णालयांतील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी डॉ. अर्चना भालेराव यांची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महानगरपालिका रुग्णालयांतील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी डॉ. अर्चना भालेराव यांची मागणी

Share This

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील आरोग्यसेवा अधिक सुरक्षित, सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी माजी आरोग्य समिती अध्यक्षा तथा नगरसेविका डॉ. अर्चना भालेराव यांनी सभागृहात विविध महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी डॉक्टरांच्या वैद्यकीय पात्रतेची काटेकोर पडताळणी, प्रत्येक मोठ्या रुग्णालयात इंटेन्सिव्हिस्ट पदनिर्मिती आणि डॉक्टरांसाठी आकर्षक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

डॉ. भालेराव यांनी कंत्राटी पद्धतीने नियुक्त होणाऱ्या डॉक्टरांच्या पात्रतेचा मुद्दा उपस्थित करत, परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांनी भारतातील आवश्यक वैद्यकीय परिषद किंवा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची (NMC) नोंदणी पूर्ण केली आहे की नाही, याची कठोर तपासणी करण्याची मागणी केली. नियमांचे पालन न करणारे डॉक्टर अथवा त्यांची नियुक्ती करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.

अतिदक्षता विभागातील रुग्णांना अधिक चांगली सेवा मिळावी यासाठी केईएम, सायन, नायरसह सर्व परिघीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र “इंटेन्सिव्हिस्ट” पद निर्माण करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. यामुळे गंभीर रुग्णांवरील उपचार अधिक प्रभावी होतील आणि मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

महानगरपालिका रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता भासत असल्याकडे लक्ष वेधताना, खासगी रुग्णालयांच्या तुलनेत अधिक चांगल्या सुविधा, संशोधनाच्या संधी, आधुनिक उपकरणे आणि प्रोत्साहनपर योजना उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डीएनबी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व संशोधन सुविधा वाढविण्याची मागणीही त्यांनी केली.

डॉक्टरांच्या दीर्घकालीन कमतरतेवर उपाय म्हणून सरकारी आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांमधून एमबीबीएस पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सेवा बंधन (Service Bond) घेऊन त्यांना महापालिकेच्या परिघीय रुग्णालयांमध्ये सेवा देणे बंधनकारक करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.

“रुग्णांची सुरक्षा, डॉक्टरांचा सन्मान आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता मजबूत करणे ही काळाची गरज आहे. महानगरपालिका रुग्णालये गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांचा आधारस्तंभ असल्याने त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत,” असे आवाहन डॉ. अर्चना भालेराव यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages