ड्रग्ज फ्री मुंबईसाठी उच्चस्तरीय समिती, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे जबाबदारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 June 2026

ड्रग्ज फ्री मुंबईसाठी उच्चस्तरीय समिती, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे जबाबदारी


मुंबई - गोरेगाव येथील नेस्को ग्राऊंड येथील एका संगीत कार्यक्रमातील ड्रग्जबळीनंतर राज्य सरकारने ड्रग्ज मुक्त मुंबईसाठी विशेष उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना या उच्चस्तरीय समितीची जबाबदारी देण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून मुंबईत १२ कलमी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या १२ कलमी कार्यक्रमास येत्या २१ जूनपासून सुरुवात होणार असून यासाठी मुंबईतील प्रत्येक पोलिस परिमंडळात स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

गोरेगाव येथील संगीत कार्यक्रमादरम्यान ड्रग्ज प्रकरणात तरुणांचा झालेल्या मृत्यूनंतर मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून यासंदर्भात दखल घेण्याची मागणी केली होती. लोढा यांच्या या पत्रानंतर राज्य सरकारच्यावतीने उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी लोढा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. 

या समितीची एक बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीत मुंबईत १२ कलमी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जून २०२६ ते जून २०२७ या कालावधीत मुंबईभर १२ विशेष उपक्रम राबविले जाणार आहेत. याची सुरुवात २१ जूनपासून घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धेने होईल. त्यानंतर जुलैमध्ये सोशल मीडियावर रील स्पर्धा, ऑगस्टमध्ये शाळा-महाविद्यालयांत नशामुक्ती शपथ, सप्टेंबरमध्ये स्ट्रीट प्ले, ऑक्टोबरमध्ये गांधी जयंतीनिमित्त शहरव्यापी रॅली, नोव्हेंबरमध्ये ‘ड्रग-फ्री मुंबई फेस्ट’, डिसेंबरमध्ये युवा संवाद, जानेवारीत ‘नो ड्रग्स झोन’ मोहीम, फेब्रुवारीत निबंध स्पर्धा, मार्चमध्ये फिटनेस मॅरेथॉन, एप्रिलमध्ये यशोगाथा मांडणी आणि मेमध्ये उत्कृष्ट वॉर्ड व कॅम्पस पुरस्कार असे कार्यक्रम होणार आहेत.

या मोहिमेचे घोषवाक्य ‘नशामुक्त मुंबई, सुरक्षित भविष्य’, ‘आपली मुंबई, नशामुक्त मुंबई’ आणि ‘मुंबई अंगेन्स्ट ड्रग्ज (मॅड) असे ठेवण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट क्षेत्र, धार्मिक संस्था, सेलिब्रिटी आणि रहिवासी संघटनांना यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. याबद्दल मंत्री लोढा म्हणाले की, ड्रग्जविरोधातील लढा केवळ पोलीस  कारवाईने जिंकता येणार नाही. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून जनचळवळ उभी करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला तातडीने मान्यता देत उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून, आता मुंबईला ड्रग्जमुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईत ड्रग्जविरोधात समन्वित आणि संघटित मोहीम उभारली जाणार असून, २१ जूनपासून सुरू होणाऱ्या या अभियानाकडे सामान्य नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले. 

स्वतंत्र समन्वय समिती - 
या मोहिमेसाठी मुंबईतील प्रत्येक पोलिस परिक्षेत्रात स्वतंत्र समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. या समित्यांमध्ये वॉर्ड अधिकारी, शिक्षण अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे प्रतिनिधी, महिला व बालकल्याण अधिकारी, समुपदेशक, पत्रकार प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिक पोलिस निरीक्षकांचा समावेश असेल. विविध घटकांना एकत्र आणून समाजपातळीवर ड्रग्जविरोधी जनचळवळ उभारण्याचा उद्देश असल्याचे लोढा यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS