महाराष्ट्रात मान्सूनची जोरदार आगेकूच; २२ ते २६ जूनदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 June 2026

महाराष्ट्रात मान्सूनची जोरदार आगेकूच; २२ ते २६ जूनदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा


मुंबई - नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्रात आणखी आगेकूच केली असून पुढील ४८ तासांत मुंबईसह राज्यातील उर्वरित भाग व्यापण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, २२ ते २६ जून या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने सोमवारी जारी केलेल्या विशेष प्रसिद्धीपत्रकानुसार, मान्सूनने महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागांमध्ये प्रगती केली आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागातही पुढील दोन दिवसांत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने कोकणात २२ ते २६ जूनदरम्यान अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह मेघगर्जना होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रात वीजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यात २२ ते २४ जूनदरम्यान मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

संभाव्य परिणाम
हवामान विभागाने या कालावधीत अनेक ठिकाणी पाणी साचणे, सखल भागांत पूरस्थिती निर्माण होणे, जुन्या व कमकुवत संरचनांचे नुकसान, झाडे उन्मळून पडणे तसेच रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. डोंगराळ भागात दरड कोसळण्याचाही धोका वर्तवण्यात आला आहे.

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला 
दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर २२ ते २६ जूनदरम्यान ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे ६० किलोमीटर प्रतितास वेगाने झोत घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

नागरिकांसाठी सूचना 
वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, विजांच्या कडकडाटावेळी झाडाखाली किंवा उघड्या जागेत थांबू नये तसेच जुन्या आणि धोकादायक इमारतींपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात मान्सूनचा जोर वाढत असल्याने पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages