पूर परिस्थितीसाठी रेल्वे, महापालिका व बेस्टने एकात्मिक कृती आराखडा तयार करावा – आशिष शेलार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 June 2026

पूर परिस्थितीसाठी रेल्वे, महापालिका व बेस्टने एकात्मिक कृती आराखडा तयार करावा – आशिष शेलार


मुंबई - पावसाळ्यात संभाव्य पूरस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी रेल्वे, महापालिका, बेस्ट, जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो आणि अन्य संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून एकात्मिक (इंटिग्रेटेड) कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिल्या.

मुंबईतील रेल्वे हद्दीतील नालेसफाई आणि मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी पश्चिम रेल्वे मुख्यालयात आयोजित समन्वय बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुंबई महानगरपालिका, मध्य व पश्चिम रेल्वे, अग्निशमन दल तसेच मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पश्चिम रेल्वेकडून चर्चगेट ते विरार मार्गादरम्यान पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी १५ मायक्रो टनेल तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यापैकी चार मायक्रो टनेल यावर्षी पूर्ण करण्यात आले आहेत. तसेच पावसाचे पाणी उपसण्यासाठी १२६ पंप कार्यान्वित करण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर गाळ उपसण्याची कामेही पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मध्य रेल्वेनेही आपल्या मार्गावरील पावसाळी तयारीची माहिती देताना २२० पंप बसविण्यात आल्याचे सांगितले. तसेच ३५० किलोमीटर लांबीच्या मार्गावरील १६० नाले व गटारांची सफाई करण्यात आली असून विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

बैठकीच्या समारोपावेळी आशिष शेलार यांनी पूरस्थिती निर्माण झाल्यास रेल्वे स्थानकांवरील गर्दीचे व्यवस्थापन, प्रवाशांना पिण्याचे पाणी व अन्नपुरवठा, बाहेरील वाहतूक कोंडी कमी करणे आणि आपत्कालीन यंत्रणांमध्ये समन्वय राखणे यासाठी स्वतंत्र एकात्मिक आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.

तसेच रेल्वे स्थानके, पादचारी पूल, वाहतूक पूल आणि परिसरातील होर्डिंग्ज यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासह रेल्वे आणि महापालिकेच्या पंप व्यवस्थेचे एकत्रित नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मस्जिद बंदर परिसरातील रेल्वे हद्दीतील धोकादायक इमारती आणि झोपडपट्ट्यांबाबत सविस्तर अहवाल तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages