घृणास्पद वक्तव्ये आणि अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही; कठोर कारवाईचे निर्देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 June 2026

घृणास्पद वक्तव्ये आणि अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही; कठोर कारवाईचे निर्देश



मुंबई - स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या लाईव्ह शोदरम्यान केईएम रुग्णालयातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी सेजल पवार हिने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने समिती नेमली असून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महापौर तावडे यांनी मनोरंजनाच्या नावाखाली कोणतेही बीभत्स प्रकार, अश्लीलता किंवा घृणास्पद वक्तव्ये सहन केली जाणार नसल्याचे ठामपणे नमूद केले. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या दोन व्हिडीओ क्लिप्समधील कथित असंवेदनशील आणि आक्षेपार्ह आशयामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले.

महाराष्ट्र सायबर विभागाने या प्रकरणाची दखल घेत कारवाई सुरू केली असून केईएम रुग्णालय प्रशासनानेही विद्यार्थिनीच्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. या प्रकरणात योग्य ती आणि कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका महापालिकेने घेतल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असला तरी त्याच्या नावाखाली महिलांचा अवमान, अश्लीलता, घृणास्पद वक्तव्ये किंवा समाजात चुकीचा संदेश देणारा मजकूर स्वीकारला जाऊ शकत नाही, असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले. महिलांविषयी, संमतीविषयी आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित संवेदनशील विषयांवर सार्वजनिक मंचावर बोलताना जबाबदारी आणि मर्यादा पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबई ही कला, संस्कृती आणि विचारस्वातंत्र्याची नगरी असली तरी मनोरंजनाच्या नावाखाली कोणाच्याही सन्मानाला धक्का पोहोचू नये, याची काळजी घेणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच सोशल मीडियाचा युवकांवर मोठा प्रभाव असल्याने कलाकार, डिजिटल कंटेंट निर्माते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी समाजहित, संवेदनशीलता आणि नैतिकतेचे भान राखावे, असे आवाहनही महापौरांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages