आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील लढा अधिक तीव्र होणार; जिल्ह्या-जिल्ह्यात आंदोलनाची घोषणा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 June 2026

आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील लढा अधिक तीव्र होणार; जिल्ह्या-जिल्ह्यात आंदोलनाची घोषणा


मुंबई, दि. ३० जून : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध करत आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर सोमवारी मोर्चा व आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केले. मुंबईतील आंदोलन सध्या स्थगित करण्यात येत असले, तरी राज्यभर जिल्हा-जिल्ह्यात आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. त्यामुळे मुंबईतील आंदोलन स्थगित करण्यात येत असले, तरी उपवर्गीकरणाविरोधातील लढा थांबणार नसून तो आता राज्यभर नेला जाईल.

ते म्हणाले, "सरकारने आश्वासन दिले असले तरी आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. अनुसूचित जातींच्या ५९ समाजघटकांमध्ये फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेतल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही."

आंबेडकर यांनी आंदोलनाला विविध सामाजिक आणि राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळाल्याचा दावा करत, "आजची लढाई अर्धी जिंकली आहे. मात्र प्रत्येक जिल्ह्यात अशाच प्रकारची आंदोलने करून सरकारवर दबाव वाढवला जाईल," असे सांगितले. मुंबईतील आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांचे त्यांनी आभारही मानले.

दरम्यान, आंदोलनात सहभागी झालेले राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार बाबुराव माने यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. अनुसूचित जातींच्या १३ टक्के आरक्षणाचे जातीनिहाय उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही, तर भविष्यातील संघर्ष सरकारला महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला.

माने म्हणाले की, हा लढा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून अनुसूचित जाती समाजाच्या एकजुटीचे प्रतीक आहे. "देशातील ५९ अनुसूचित जातींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. आमची एकमेव मागणी म्हणजे उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा," असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकार समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत त्यांनी मराठा, ओबीसी आणि आता अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले. मातंग समाजाबाबत बोलताना त्यांनी, "मातंग समाज आमचेच बांधव आहेत. त्यांच्या विकासासाठी सरकारने विशेष आर्थिक पॅकेज दिले, तरी आम्हाला त्याचा विरोध नाही. मात्र आरक्षणात फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही स्वीकारणार नाही," असेही स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages